अमरावती : शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज शुक्रवारी झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये सात जणांनी जीव गमावला. खरपी मार्गावरील अपघातात तिघे ठार झाले, बैतूल-परतवाडा मार्गावर एका दुचाकी चालकाने जीव गमावला तर अमरावती ते चांदूर रेल्वे रोडवरील एसआरपीएफ कॅम्पपुढे बाप-लेकीचा दुर्दैवी अंत झाला. अचलपूर तालुक्यात दुचाकी पेटल्याने चालकाचा जागीच कोळसा झाला.
परतवाडा-बैतूल मार्गावरील खरपीनजीक ट्रक व ऑटोरिक्षाच्या धडकेत नऊ वर्षांच्या चिमुकलीसह तिघांचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास घडला. मेहरा परवीन शेख मजहर (वय ९), शिरीन परवीन शेख जमीन (४२, दोन्ही रा. धारणी) व ट्रकचालक श्यामू घनश्याम धुर्वे (४२, रा. आठनेर, मध्य प्रदेश) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. ट्रकमधील दोघांसह आठ जण जखमी झाले.
बैतूल-परतवाडा मार्गावर भरधाव चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. सय्यद अल्ताफ अलीस सय्यद महमूद (३२, रा. खिडकीपुरा, अंजनगाव सुर्जी) असे मृताचे नाव आहे. त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीला वाचविताना चारचाकी रस्त्याच्या कडेला खाली उतरली. यातील सात ते आठ वऱ्हाडी जखमी झाले.
अन्य एका घटनेत भरधाव ट्रकने समोरून येणाऱ्या कारला दिलेल्या धडकेत वडील व मुलीचा करुण अंत झाला. अमरावती ते चांदूर रेल्वे रोडवरील एसआरपीएफ कॅम्पसमोरच्या वैष्णोदेवी मंदिरालगत शुक्रवारी दुपारी ३ च्या सुमारास हा अपघात झाला. साहेबराव माणिकराव खरबडे (वय ६२) व रेणू साहेबराव खरबडे (२८, दोघेही रा. साईविधी अपार्टमेंट, शेगाव ते रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात खरबडे कुटुंबाची कार चक्काचूर झाली. साहेबराव खरबडे हे मुलगी रेणू व पत्नी विजया खरबडे (५२) यांच्यासह वर्धेहून चांदूर रेल्वे मार्गे अमरावतीकडे येत होते. रेणू ही कार चालवत होती.
दुचाकीने अचानक घेतला पेट
भरउन्हात शेताकडे निघालेल्या शेतकऱ्याच्या दुचाकीने अचानक पेट घेतला. काही कळायच्या आतच स्फोट झाला आणि दुचाकीसह तो शेतकरी घटनास्थळीच जळून खाक झाला. या दुर्दैवी घटनेत त्या दुचाकीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला, तर शेतकऱ्याचा कोळसा झाला. अचलपूर येथील ज्ञानेश्वर मधुकरराव गणगणे (४२, रा. माळीपुरा) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.