लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात आठ मतदारसंघांतील निवडणूक प्रक्रिया गतिमान झालेली आहे. या अनुषंगाने आयोगाचे सात ऑब्झर्व्हर जिल्ह्यात येणार आहेत. यापैकी निवडणूक खर्चाचे तीन निरीक्षक जिल्ह्यात मागील आठवड्यात दाखल झालेले आहेत.जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आयोगाचे सामान्य निरीक्षक मध्य प्रदेश येथील आयएएस राजीव शर्मा यांच्याकडे धामणगाव रेल्वे व बडनेरा, राजस्थान येथील आयएएस जितेंद्रकुमार सोनी यांच्याकडे अमरावती, तिवसा, ओरिसा येथील आयएएस प्रेमानंद खुंटिया यांच्याकडे दर्यापूर व मेळघाट तसेच राजस्थानचे आयएएस महावीर प्रसाद वर्मा यांच्याकडे अचलपूर व मोर्शी विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. याव्यतिरिक्त आठही विधानसभा मतदारसंघांतील कायदा व सुव्यवस्थेची आयपीएस गुरशरणसिंग संधू यांच्याकडे जबाबदारी आहे.आठही विधानसभा मतदारसंघांमध्ये ४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची प्रक्रिया संपुष्टात येईल. त्यानंतरच आयोगाचे चारही सामान्य निरीक्षक जिल्ह्यात डेरेदाखल होणार आहेत. त्याच दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचे निरीक्षकदेखील जिल्ह्यात येणार असल्याची माहिती आहे.
निवडणूक खर्चाचा आढावानिवडणूक निरीक्षण (उमेदवारी खर्च) साठी आयोगाद्वारे आंध्र प्रदेशचे आयआरएस रामकृष्ण बंदी यांच्याकडे धामणगाव, बडनेरा व अमरावती विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. आसाम येथील आयआरएस अरुप चॅटर्जी यांच्याकडे मेळघाट व अचलपूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे तसेच केरळ येथील आयआरएस जॉर्ज जोसेफ यांच्याकडे तिवसा, दर्यापूर व मोर्शी विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. हे तीनही निरीक्षक जिल्ह्यात दाखल झालेले आहेत व त्यांनी पथक व नोडल अधिकाऱ्यांद्वारे आढावा घेतला आहे.