अमरावती : नववर्षाच्या पहिल्या आठवड्यातील तीन दिवसात शहरातील विविध ठिकाणांहुन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. कोतवाली, राजापेठ, बडनेरा व गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल सात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद पोलीस दफ्तरी करण्यात आली आहे.
गतवर्षी पोलीस आयुक्तालयामध्ये वाहन चोरीच्या एकूण ३१० तक्रारींची नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे शहरातील सीसीटीव्ही व पार्किंगचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. तीन दिवसात तब्बल सात दुचाकी चोरीला गेल्याची नोंद झाल्याने दुचाकीचोराने ‘सप्तरंग’ उधळल्याची प्रतिक्रिया अमरावतीकरांमधून उमटली आहे.
गोपालनगर येथील डी मार्टमधून (एमएच २७, बीए ९८२०) क्रमांकाची दुचाकी लंपास करण्यात आली. २ जानेवारी रोजी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी अजिंक्य आवारे (रा. हार्दिक कॉलनी) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी ३ जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला. श्याम चौक येथील संत कंवरराम मार्केट परिसरातून (एमएच २७, एएन ९९२६) ही दुचाकी लंपास करण्यात आली. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून ३ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला.
गाडगेनगर येथील तंत्रनिकेतनजवळील एका चाट भंडार परिसरातून (एमएच २७, एएम ०३३६) क्रमांकाची दुचाकी २ जानेवारी रोजी चोरीला गेली. याप्रकरणी रोशन चाैधरी (रा. वर्हा, ह. मु. गाडगेनगर) यांच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी ३ जानेवारी रोजी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला. नवाथे येथील एका घरासमोरून (एमएच २७, बीएच १५६९) ही दुचाकी १ जानेवारी रोजी चोरीला गेली. महालक्ष्मी मेडिकलमागे ही घटना घडली. याप्रकरणी विजय गवई (३९, रा. दस्तुरनगर) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी सोमवारी गुन्हा नोंदवला.
दुकान बंद केले, न दुचाकी दिसेना
गोपालनगर येथील तेजस वानखडे (२१) यांनी त्यांच्या दुकानासमोर वाहन ठेवले व ते कामात गुंतले. २ जानेवारी रोजी रात्री ९च्या सुमारास दुकान बंद केल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बडनेराच्या जयस्तंभ चौक येथे मित्राच्या घराजवळ ठेवलेली (एमएच २९, एई ९२५८) क्रमांकाची दुचाकी २ ते ३ जानेवारी दरम्यान चोरीला गेली. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी ४ जानेवारी रोजी पुरेश बुच्चा (मच्छीसाथ, सराफा बाजार) यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला. मित्राकडे दुचाकी ठेवून ते वर्धा येथे निघून गेले होते. तर पंचवटी चौकातून योगेश बोरकर (प्रवीणनगर) यांची दुचाकी चोरीला गेल्याची नोंद ५ जानेवारी रोजी गाडगेनगर पोलिसांनी केली.