अमरावती : गुन्हे शाखेच्या पथकाने रहाटगाव परिसरातील मिलिंदनगरातून दोन लोखंडी तलवारीसह एक सत्तुर जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी अजित गजानन खोडके (२४ रा. मिलिंदनगर) याला अटक केली.
गुप्त माहितवरून पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पीआय कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय जे.एन.सैय्यद, पोलीस कर्मचारी प्रकाश जगताप, देवेंद्र कोठेकर, मोहम्मद सुलतान, विशाल वाकपांजर व प्रशांत नेवारे यांचे पथक नांदगाव पेठ हद्दीतील अनुराधा पेट्रोल पंप येथे गेले. त्यावेळी तेथे एक इसम हातात तलवार बाळगून उभा असल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तलवार जप्त केली. त्याने अजित गजानन खोडके असे नाव पोलिसांना सांगितले. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अजितच्या घराची झडती घेतली. त्यावेळी तेथे आणखी एक लोखंडी सत्तुर आणि गुप्ती मिळाली. पोलिसांनी ही शस्त्र जप्त करून आरोपीला नांदगाव पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.