अमरावती तालुका : तलाठ्यांची झाडाझडती अमरावती : भूदान जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये असणारे शेरे कमी करण्यासोबतच सातबारावर भूदान जमीन अहस्तांतरणीय अशी नोंद घेण्याचे आदेश तहसीलदार सुरश बगळे यांनी दिले. भूदान जमिनीच्या सातबाऱ्यामध्ये अमरावती तालुक्यात भोगवटदार वर्ग बदलले असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदारांनी गांभीर्याने दखल घेऊन तालुक्यामधील मंडळ अधिकारी व तलाठी यांची सोमवारी बैठक बोलाविली. सर्व सातबाऱ्या विषयक चर्चा केली.‘त्या’ तलाठ्याला दिली समज अमरावती : या बैठकीदरम्यान भूदानच्या अनेक सातबाऱ्यामध्ये अनियमितता आढळून आली. हे रेकॉर्ड फार पूर्वीचे आहे. त्यामुळे यासर्व सातबाऱ्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित तलाठ्यांना दिले. काही प्रकरणात त्यांनी सुनावणी ठेवली आहे. या विषयी संबंधितांना नोटिस पाठविण्याचे आदेश त्यांनी दिलेत. यावेळी भूदानयज्ञ मंडळाचे जिल्हा प्रभारी नरेंद्र बैस यांच्याशी त्यांनी सविस्तर चर्चा केली. या मंडळाच्या सूचना त्यांनी स्वीकारल्या. वेळोवेळी संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले. कापूसतळणी येथील तलाठ्याचे एकाच शेताचे सातबारे प्रथम भोगवटदार वर्ग -२ व नंतर भोगवटदार वर्ग -१ असे मंडळाला दिले आहेत. यावर तहसीलदार बगळे यांनी त्या तलाठ्याला चांगलेच खडसावले.सदर प्रकरणात इतर अधिकारात नोंदी घेतल्या आहेत व तो सातबारा देखील तत्काळ दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. तो शेरा वगळणार भूदानच्या सातबाऱ्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय व्यवहार होणार नाही. म्हणजेच जिल्हाधिकारी या जमीनीची विक्री करण्याची परवानगी देऊ शकतात, असाही होतो असे मंडळाचे नरेंद्र बैस यांनी सांगताच हा शेरा वगळण्यात येऊन तेथे भूदान व अहस्तांतरणीय अशी नोेंद घेण्यात येईल असे तहसीलदार बगळे यांनी सांगितले.तालुक्यामधील सर्व भूदान जमिनीच्या सातबाऱ्यावरील नोंदी अद्ययावत करण्यात येतील. काही ठिकाणी अनियमितता झाली आहे. या सर्व सातबाऱ्यांवर भूदान व अहस्तांतरणीय अशा नोंदी घेण्याचे आदेश तलाठ्यांना दिले आहेत. - सुरेश बगळे, तहसीलदार
भूदानचे सातबारा दुरुस्तीचे आदेश
By admin | Published: January 20, 2016 12:28 AM