लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परदेशवारी करून अमरावती जिल्ह््यात तब्बल ७२ नागरिक दाखल झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. जिल्हावासीयांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.थायलंड, दुबई, नेपाळ या देशांतून परतलेल्या या मंडळींची माहिती गुरुवारपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी टूर्स अँड ट्रॅव्हल्स असोसिएशन (अट्टा) ची बैठक बोलविल्यावर हा आकडा पुढे आला. परतलेल्या या सर्व नागरिकांची वैद्यकीय तपासणी अद्याप पूर्ण व्हावयाची आहे. परदेशवारी करून परतलेली ही मंडळी २५ फेब्रुवारी ते १२ मार्च या कालावधीत जिल्ह्यात दाखल झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. या नागरिकांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तीन सदस्यीय समिती गठित केली. त्यात जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हुमने, महापालिकेचे डॉ. विक्रांत राजूरकर आणि अमरावती तहसीलचे नायब तहसीलदार दिनेश बढिये यांचा समावेश आहे.एकाच टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीकडून नेपाळहून परतलेल्या ४१ व्यक्तींची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली आहे. तपासणी समितीला ती माहिती पुरविण्यात आली. तथापि, उर्वरित ३१ पर्यटकांपैकी चार जणांची कुठलीही माहिती प्राप्त झालेली नाही. २७ जण कुठल्या देशातून परतले, हे कळले असले तरी माहिती त्रोटक आहे. शोधकार्य सुरू आहे.जपानवरून परतलेला युवक संशयितअमरावती : जपानवारी करून अमरावती जिल्ह्यात परतलेल्या एका युवकाला 'नोवेल कोरोना’ या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. त्या युवकाचा ‘थ्रोट स्वॅब’ (घशातील लाळीचा नमुना) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात तपासणीकरिता पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक तथा इन्सिडंट कमांडर डॉ. श्यामसुंदर निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.सदर युवक शनिवारी दुपारी इर्विन रुग्णालयात स्थापन करण्यात आलेल्या आयसोलेशन केंद्रात स्वत:हून दाखल झाला. तो विदेशातून आल्यामुळे व त्याला सर्दी, खोकला, ताप ही ‘कोरोना’ आजाराची लक्षणे आढळून आल्यामुळे तो दाखल झाला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने त्याचे ‘थ्रोट स्वॅब’ घेतले. सदर युवक ‘कोरोना’संशयित असला तरीही ‘कोरोना’ची लागण झाली की कसे, याचे निश्चित निदान अहवालानंतरच ठरणार असल्याचे डॉ. निकम यांनी स्पष्ट केले.सदर युवकाला उपचाराकरिता तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात आले आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाकडून रविवारी किंवा सोमवारी सकाळपर्यंत अहवाल येणे अपेक्षित असल्याचे डॉ. निकम म्हणाले. जे रुग्ण दाखल होत आहेत, त्यांची नोंद आयसोलेशन केंद्रात ठेवण्यात येत आहे. जे नागरिक विदेशातून जिल्ह्यात परतले आहेत, त्यांना ‘कोरोना’ची प्राथमिक लक्षणे जरी आढळून आली नसली तरी त्यांनी १४ दिवसापर्यंत घर सोडून कुठेही जाऊ नये, लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
परदेशातून अमरावतीत परतले ७२ नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 6:00 AM
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : परदेशवारी करून अमरावती जिल्ह््यात तब्बल ७२ नागरिक दाखल झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती पुढे आली आहे. ...
ठळक मुद्देएक संशयित : तीन सदस्यांद्वारे होणार प्रकृतीची चौकशी, आगंतुकांचा शोध सुरू