बेलोरा (अमरावती) : अकरावी इयत्तेतील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला लैंगिक शोषणातून गर्भधारणा झाली. पोट दुखत असल्याने तिला बुधवारी दवाखान्यात आणण्यात आले. तेथे सोनोग्राफीनंतर ही धक्कादायक घटना उघड झाली. चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या प्रकरणी आरोपीस अटक करण्यात आली आहे. अंकुश अरविंद इंगळे (२२) रा. अमरावती असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारीनुसार, आरोपी अंकुशची आजी पीडित १६ वर्षीय मुलीच्या घराशेजारी राहते. अंकुशचे आजीकडे नेहमी येणे-जाणे होते. या काळात त्याची ओळख पीडित मुलीसोबत झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित व मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाल्यावर त्यांच्यात मोबाइलवर संवाद सुरू झाला. पिडिता ही चांदूरबाजार तालुक्यातील एका उच्च माध्यमिक शाळेतील अकरावीची विद्यार्थीनी आहे. दरम्यान जून महिन्यात अंकुश हा तिच्या शाळेत गेला. शाळेला सुटी झाल्यावर अंकुश हा पीडित मुलीला दुचाकीवर बसवून शेतशिवारात घेऊन गेला. शेतातील एका खोलीत लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिचे लैंगिक शोषण केले. त्यानंतर त्याने पीडित मुलीला परत सोडून दिले. ऑगस्ट महिन्यात देखील त्याने तिला चांदूरबाजार बसस्थानकाहून एका शिवारात नेले. तेथे देखील त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतरही दोघांमध्ये टेलिफोनिक संवाद सुरू होता.
असे फुटले बिंग
अलिकडे पीडित मुलीची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिच्या आईने २१ डिसेंबर रोजी तिला रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी पीडित मुलगी ही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. तसेच रुग्णालय प्रशासनाने पीडिता ही अल्पवयीन असल्याचे चांदूरबाजार पोलिसांनाही माहिती दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी विनोद इंगळे यांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचे बयाण नोंदविले. यावेळी तिने आपबिती कथन केली. पीडित मुलीच्या बयाणावरून चांदूरबाजार पोलिसांनी आरोपी अंकुशविरुद्ध अपहरण, बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रतिभा मेश्राम करीत आहेत.