परतवाडा (अमरावती) : मेळघाटात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन मातृत्व लादल्याप्रकरणी धारणी पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. लोकमतने सदर वृत्त प्रकाशित केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी चौकशी आरंभली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मेळघाटातील धारणी तालुक्याच्या एका गावात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मातृत्व लादण्यात आले. ती सहा महिन्यांची गर्भवती आहे. या प्रकरणात पीडित मुलीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी युवकाविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
धक्कादायक ! आमदारांच्या झिल्पी गावात अल्पवयीन मुलीचा विवाह
लोकमतच्या वृत्तानंतर प्रशासनात खळबळ
लोकमतने या प्रकरणाची माहिती संबंधित गावातील पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका यांच्याकडून अधिकृतरीत्या घेतली. त्यानंतर प्रकरण आपल्या अंगावर शेकेल, या भीतीने पोलीस ठाण्याला कळविण्यात आले. सहा महिन्यांपासून प्रकरण माहीत असताना दाबण्याचा प्रयत्न झाल्याचेच यातून स्पष्ट होत आहे.
आरोपीला अटक, चौकशी प्रारंभ
बालविवाह कायद्याने गुन्हा असला तरी या मुलीचा विवाह गावपंचायतीमार्फतच लावण्यात आल्याची चर्चा आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी लोकमतशी बोलताना वर्तविली.
बालविवाह अन् प्रसूती
मेळघाटात होणारे बालविवाह थांबवण्यात ग्रामस्तरावर ग्रामपंचायत, पोलीस पाटील, अंगणवाडी व कार्यरत असलेल्या संस्था कुचकामी ठरत असल्याचे या प्रकरणाने उघडकीस आले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.
प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे. तपासाअंती आरोपींची संख्या वाढल्यास त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल.
- सुरेंद्र बेलखेडे, ठाणेदार धारणी