अमरावती : मॉर्निंग वॉकला आलेल्या एका महिलेची छेड काढून तिचा पाठलाग करण्यात आल्याची घटना विभागीय क्रीडा संकूलाच्या आवारात सोमवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घडली. अरेरावी करणाऱ्या विशिष्ट समाजाच्या या युवकाला महिलेचे नातेवाईक व उपस्थित नागरिकांनी घेराव घालून धक्काबुक्की केली. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
इब्रान अली अब्बास अली (३२, रा. अलहिलाल कॉलनी) असे छेडखानी करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम ३५४, ३५४ (ड), २९४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेमुळे क्रीडा संकुलात मॉर्निंग वाॅक व व्यायाम करण्याकरिता असलेल्या लहान मुली व महिला असुरक्षित असल्याची भावना व्यक्त होत आहे.
पोलीस सूत्रांनुसार, सकाळी ८ च्या सुमारास एका महिला आईसोबत क्रीडा संकुलाच्या ट्रॅकवर वाॅक करीत होती. अधिकृत मैदान नसतानाही याच ट्रॅकवर विशिष्ट समाजाचे काही युवक व्हॉलीबॉल खेळत होते. त्यांच्याकडून आलेला चेंडू महिलेला लागला. त्यांनी युवकांना जाब विचारला असता, इब्रानने अश्लील शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर छेड काढून तिचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार महिलेने फोनवर सांगताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले. काही नागरिकही तेथे गोळा झाले. त्यांनी इब्रानला घेराव घालून जाब विचारला असता, त्याने हुज्जत घातली. त्यांच्याशी त्याची धक्काबुक्की झाली. हा प्रकार गाडगेनगर पोलिसांना कळविल्यानंतर उपनिरीक्षक मनीष वाकोडे यांच्यासह पोलीस दाखल झाले व युवकाला ताब्यात घेतले.
छेडखानी झाल्याचे मैदानात उपस्थित काही महिलांनी पोलिसांना सांगितले. या घटनेचा व्हिडीन्व्हायरल झाला आहे. इब्रानला न्यायालयासमोर हजर करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली.
बॉक्स:
क्रीडा संकुलमध्ये टारगट युवकांचा वावर
काही आठवड्यांपूर्वीच पोलीस भरतीसाठी सराव करणारे युवा तसेच क्रीडाक्षेत्रासाठी विभागीय क्रीडा संकुल खुले झाल्यापासून विशिष्ट समाजाच्या टवाळखोर युवकांचा वावर वाढला आहे. महिला व मुलींची सुरक्षा यामुळे धोक्यात आली आहे. या प्रकाराला वेळीस नियंत्रित न केल्यास अनुचित घटना घडेल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत.
कोट
सध्या फक्त पोलीस भरतीकरिता मैदान वापरण्याची परवानगी दिली आहे. बाहेरील नागरिक मॉर्निंग वाकला येतात. त्यांच्यावर मैदान सेवकाच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येईल. पोलिसांना यापूर्वीच पत्र दिले आहे. रात्री दामिनी पथकाची गस्त होते. सोमवारी घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोणातून मुख्य प्रवेशद्वारावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येईल.
गणेश जाधव प्रभारी क्रीडा उपसंचालक