अमरावती:
‘दुसरेसें शादी कर रही है ना; तू तो गई ! असा गर्भित इशारा देत वागदत वधुुला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तिच्या नियोजित लग्नात अडसर निर्माण करण्यात आला. ते धमकीसत्र सुरूच राहिल्याने अखेर त्या तरूणीने १३ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी आरोपी फैजान खान अन्नु खान (२१, अन्सारनगर, नमक कारखान्याजवळ, अमरावती) याच्याविरूध्द विनयभंग तथा शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपी फैजान खान अन्नू खान हा पिडित तरूणीच्या जावयाचा मित्र आहे. घरी येणे जाणे असल्याने तिची आरोपीसोबत ओळख झाली. ७ फेब्रुवारी २०२२ रोजी पिडिताच्या बहिणीच्या नणंदेच्या साक्षगंध कार्यक्रमाला फैजान खान आला होता. त्यावेळी आपले तुझ्यावर प्रेम आहे, अशी बतावणी त्याने तरूणीकडे केली. तिने नकार दिला. तेव्हापासून आरोपी हा तिच्या मागे लागला होता. तो तिच्या बहिणीच्या घरी देखील दोन ते तीन वेळेस आला होता त्यावेळेस तो तरूणीसोबत बोलण्याचा प्रयत्न करीत होता. ती मार्केटमध्ये कामानिमित्त गेली असता त्याने तिचा पाठलाग करून बोलण्याचा खटाटोप केला. मात्र ती न बोलल्याने आरोपीने तिच्या आईचा मोबाईल क्रमांकावर वारंवार फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. मला तू आवडतेस, तू माझ्यासोबत लग्न कर, असे बोलत होता. माझ्यासोबत लग्र केले नाही, तर तुझ्यासह आई-वडिलांना जीवाने मारण्याची धमकी आरोपीने दिली.