अमरावती : राज्याच्या वन विभागाचे नवीन वनबल प्रमुख म्हणून शैलेश टेभुर्णीकर यांच्या रूपाने तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठी अधिकारी मिळाला आहे. त्याअनुषंगाने टेभुर्णीकर यांच्या नियुक्तीचा आदेश गुरूवार, ३१ ऑगस्ट रोजी वन मंत्रालयाचे मुख्य संरक्षक रवीकिरण गोवेकर यांनी जारी केला आहे.
विद्यमान वन बलप्रमुख वाय.एल.पी. राव हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. पीसीसीएफ या पदासाठी सुनीता सिंह आणि शैलेश टेभुर्णीकर यांच्यात जोरदार स्पर्धा होती. मात्र, शैलेश टेभुर्णीकर यांनी बाजी मारली असून ते यापूर्वी प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) या पदावर कार्यरत हाेते. राव यांच्याकडून टेभुर्णीकर यांनी वनबल प्रमुख पदाचा कारभार स्वीकारावा असे आदेशात नमूद आहे.
पहिल्यांदाच वनबल प्रमुखपदी मराठी अधिकारी म्हणून आयएफएस शैलेश टेभुर्णीकर यांची वर्णी लागली आहे. ते मूळ नांदेड जिल्ह्यातील आहेत. अकोट येथे उपवनसंरक्षकपदी त्यांनी कर्तव्य बजावले आहे. आयएफएस म्हणून टेभुर्णीकर यांची कारकिर्द चांगली राहिली आहे.