अमरावती : राज्यात सध्या सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत आहे. ११ महिन्यातील कोरोना संसर्गात गुरुवारी पुन्हा उच्चांकी ५९७ रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्याला कोरोनाचा हादरा बसला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७,३२३ वर पोहोचली आहे. गुरुवारी १,७९९ नमुुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३३.१८ टक्के अशी पॉझिटिव्हिटीची धक्कादायक नोंद झालेली आहे.
जानेवारीपश्चात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अलर्ट जिल्हा प्रशासनाने दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करणे आता चांगलेच महागात पडू लागले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दर शनिवार व रविवारी लॉकडाऊन, मार्केट ८ वाजता बंद यासोबतच धार्मिक ठिकाणी केवळ पाच व्यक्तींची उपस्थिती यासारखे कठोर निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहेत. याशिवाय पथकांद्वारा चौकाचौकांत मास्कचा वापर न करणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास मंगल कार्यालये, लॉन, सभागृह चालक, मालक यांच्यावर ५० हजारांवर दंडाची कारवाई केली जात आहे.
बॉक्स
१०० नमुने जिनोम स्टडीकरीता पुण्याला
पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला विद्यापीठ लॅबद्वारा मागच्या आठवड्यात पाच नमुने जिनोम स्टडीकरिता पाठविले होते. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त असताना गुरुवारी पुन्हा १०० नमुने पाठविल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली.
बॉक्स
पाचही झोनमध्ये सुपर स्प्रेडरची नमूने तपासणी
पुर्वझोन क्रमांक ३ मध्ये महापालिका क्षेत्रातील व्यापारी वर्गासाठी स्वॅब सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय पाचही झोनमध्ये सुपर स्प्रेडर व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्याचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. दरम्यान त्यांनी झोन क्रमांक ३ येथील केंद्राला भेट देऊन सहायक आयुक्त नंदकुमार तिखिले व वैद्यकीय अधिकारी प्रतिभा आत्राम यांच्याशी चर्चा केली.
बॉक्स
अनावश्यक गर्दी नको, ज्येष्ठांची काळजी घ्या - मनपा आयुक्त
यापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीदेखील पुन्हा पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळा, ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या, बीपी, शुगरसारखे आजार असणा-या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, राज्यात सध्या सर्वाधिक संक्रमित व्यक्तींची नोंद अमरावतीमध्ये होत आहे. अधिक जनसंपर्क असणा-या व्यक्तींनी व सर्व आस्थापनांमधील सर्व कर्मचा-यांची नमुने चाचणी करावी व त्रिसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले.
बॉक्स
असा वाढला कोरोना
पाॅइंटर
असे आहे पॉझिटिव्ह
१० फेब्रुवारी : ३५९
११ फेब्रुवारी : ३१५
१२ फेब्रुवारी : ३६९
१३ फेब्रुवारी : ३७६
१४ फेब्रुवारी : ३९९
१५ फेब्रुवारी : ४४९
१६ फेब्रुवारी : ४८५
१७ फेब्रुवारी : ४९८
१८ फेब्रुवारी : ५९८