लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर-मूर्तिजापूर नॅरोगेज लोहमार्गावरील शकुंतला रेल्वे ही गाडी रेल्वे प्रशासनाने कायमची बंद केली आहे.शकुंतलेचे रेल्वे डिझेल इंजिन अकोला रेल्वे स्टेशनबाहेर दर्शनी भागात एका उंच ओट्यावर चढवून प्रदर्शनात ठेवले आहे. एक जुने रेल्वे इंजिन म्हणून ते येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या रेल्वे इंजिनला नव्याने रंगरंगोटीही करण्यात आली असून, शकुंतलेची आठवण म्हणून ते त्या ठिकाणी उभे आहे.अचलपूर-मूर्तिजापूर या ७५.६४ किलोमीटर लांबीचा नॅरोगेज लोहमार्ग व तिचे डबे संबंधित प्रशासनाने भंगारात काढले आहेत. शकुंतलेचे रेल्वे इंजिन अकोल्यात दिसत असले तरी तिचे डबे नेमके कुठे आहेत, यावर अधिकृतपणे कुणीही बोलायला तयार नाही. या मार्गावर अचलपूर, नौबाग, चमक, कुष्टा बु., पथ्रोट, अंजनगाव, कापूसतळणी, कोकलडा, लेहगाव, बनोसा, लाखपुरी आणि मूर्तिजापूर अशी ११ रेल्वे स्थानके आहेत. यातील नौबाग, पथ्रोटसह काही रेल्वे स्थानकांवरील व्यवस्था, इमारती, यापूर्वीच उद्ध्वस्त झाल्या आहेत. अचलपूर, अंजनगाव बनोसासह काही शिल्लक स्थानके रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षीत आहेत. लोहमार्ग आणि डब्बे भंगारात काढल्यानंतर ही स्थानकेही भंगाराच्या दिशेने निघाली आहेत. यातील काही रेल्वे स्थानकांवर आरक्षणाची सुविधा तेवढी दिलासादायक आहे. १९१६ चा रेल्वेचा करार १९४७ लाच रद्द करता आला असता. २०१६-१७ मध्येही भारतीय रेल्वेने हा मार्ग विकत घेण्यासाठी पावले उचलली नाहीत.नकोशीरेल्वे प्रशासनालाच ही शकुंतला नकोशी होती. शकुंतलेला सुरु ठेवण्याची त्यांची मानसिकताच नव्हती. या लोहमार्गावरील मूर्र्तिजापूर-लाखपुरी सेक्शनमधील पायटांगी नामक छोट्या पुलावरील लाकडी स्पिलर जळाल्याचे एप्रिल २०१९ मध्ये निमित्त झाले. यादरम्यान मे २०१९ मध्ये या मार्गाच्या सर्वेक्षणाचा घाट रेल्वे प्र्रशासनाने रचला. रेल्वे मार्ग वाहतुकीस योग्य नाही. १५ पुलांपैकी काही धोकादायक आहेत. स्टील पिपॉड स्लिपर्स असलेल्या काळ्या मातीवरील या रेल्वे मार्गात काही गिट्टी अंथरुन त्यावर रेल्वे मार्ग घेणे आवश्यक असल्याचा भक्कम अहवाल, अभिप्राय रेल्वे प्रशासनाने दिला. यापूर्वी या लोहमार्गावरील पाच गेटवरील गेटमन काढून घेतलेत. २२ ठिकाणी शकुंतलेच्या वेगावर मर्यादा घातली. केवळ ५ ते १० किलोमीटर वेगाने धावण्यास बाध्य केले.
‘शकुंतला’ रेल्वे कायमची बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2020 5:00 AM
रेल्वे प्रशासनालाच ही शकुंतला नकोशी होती. शकुंतलेला सुरु ठेवण्याची त्यांची मानसिकताच नव्हती. या लोहमार्गावरील मूर्र्तिजापूर-लाखपुरी सेक्शनमधील पायटांगी नामक छोट्या पुलावरील लाकडी स्पिलर जळाल्याचे एप्रिल २०१९ मध्ये निमित्त झाले. यादरम्यान मे २०१९ मध्ये या मार्गाच्या सर्वेक्षणाचा घाट रेल्वे प्र्रशासनाने रचला. रेल्वे मार्ग वाहतुकीस योग्य नाही. १५ पुलांपैकी काही धोकादायक आहेत.
ठळक मुद्देइंजिन अकोला येथील यार्डात : लोहमार्गासह डबे भंगारात, आरक्षण सुविधा कायम