नरेंद्र जावरे
अमरावती : वझ्झर फाटा येथील स्व. अंबादासपंत वैद्य मूकबधिर, मतिमंद, अनाथ बालगृहामध्ये लहानाचे मोठे झालेले मूकबधिर वर्षा व समीर यांच्या मुलाच्या उपचारासाठी अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर आईचे मंगळसूत्र गहाण ठेवून खासगी रुग्णालयात पोहोचले. कर्माची नाळ जुळलेल्या नातवाला वाचविण्याची त्यांची ही धडपड पाहून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी रकमेची तरतूद केली आणि उपचाराअंती बाळ मूकबधिर मातेच्या कुशीत सकुशल विसावले.
वर्षा व समीर यांचा विवाह २० डिसेंबर २०२० रोजी नागपूर येथे तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत झाला होता. वर्षा आठ महिन्यांची गर्भवती असताना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पोट अतिशय दुखत असल्याने तिला अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तिला अमरावतीला नेण्याचे सुचविले. रात्री ११ वाजता अमरावतीत दाखल झाल्यानंतर नाईलाजाने राजापेठ परिसरातील खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. तेथे सोनोग्राफी, रक्त तपासणी करून सिझेरियन प्रसूतीकरिता ५० हजार रुपये ताबडतोब भरा, असे सांगण्यात आले. ही बाब प्रमिला नघाटे यांनी वझ्झर येथे शंकरबाबांना कळविली. त्यांनी दुसऱ्या दिवशी १२ वाजेपावेतो पैसे भरणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, रात्री १२ वाजता प्रसूती झाली. बाळाचे वजन १४०० ग्रॅम होते. म्हणून त्याला गाडगेनगर येथील बालरोगतज्ज्ञाकडे दाखल केले. तेथे पाच हजार रुपये प्रतिदिन खर्च सांगण्यात आला. शंकरबाबांनी बाळाच्या आईचे मंगळसूत्र, नथ, कानातले तसेच त्यांच्या आईचे जुने दागिने एका सावकाराकडे गहाण ठेवून काही रकमेची तरतूद केली. ५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी रुग्णालयात जाऊन बाळाची विशेष काळजी घेण्याचे डॉक्टरांना सांगितले. ८ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या काळात बाळ आईपासून दूर ठेवण्यात आले. यादरम्यान बाळाचे वजन १४०० वरून २५०० ग्रॅम झाले आणि ते आईच्या कुशीत आले.
रुग्णालयातून २५ नोव्हेंबर रोजी दीड लाख भरून बाळाला घरी घेऊन जाऊ शकता, असे कळविण्यात आले. शंकरबाबांनी या रकमेसाठी अखेरचा प्रयत्न म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशी फोनवरून संवाद साधला. परिणामी २६ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता शंकरबाबांना बाळाला घरी घेऊन जाऊ शकता, पैसे डॉ. निकम यांनी भरले, असे कळविण्यात आले.
बालरोगतज्ज्ञांनी अथक प्रयत्नांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आणि योग्य तो उपचार करून माझ्या नातवाचे प्राण वाचविले. मुलामध्ये कुठलेही अपंगत्व नाही. माझ्या १२३ दिव्यांग मुलांच्यावतीने त्यांचे खूप आभार.
- शंकरबाबा पापळकर, ज्येष्ठ समाजसेवक, वझ्झर, अचलपूर