अमरावती : अनाथ, बेवारसांचे पालनकर्ते वझ्झर येथील शंकरबाबा पापळकर यांची दृष्टीहीन मानसकन्या माला बी.ए. अंतिम वर्षाची परीक्षा देत आहे. उपजिल्हाधिकारी गणेश पाटील यांनी तिला पुष्पगुच्छासह शुभेच्छा दिल्या.
शंकरबाबा पापळकर यांच्या वझ्झर येथील अनाथाश्रमात दिव्यांग व अनाथ बालकांचे पालन पोषण करून त्यांना शिक्षित करण्यात येते. शंकरबाबांनी आतापर्यंत अनेक अनाथ बालकांना सज्ञान व सुशिक्षित करून त्यांचा संसार थाटलेला आहे. बाल्यावस्थेत शंकरबाबांना माला जळगावात बेवारस अवस्थेत मिळाली. तेथून तिला वझ्झर आश्रमात आणले. काही महिन्यांपूर्वी मालाचा विवाह अमरावती येथे पार पडला. माला ही येथील विदर्भ विज्ञान महाविद्यालयाची बी.ए. भाग ३ ची विद्यार्थिनी आहे.
सद्यस्थितीत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची उन्हाळी परीक्षा सुरू असून बी.ए.च्या अंतिम वर्षाचे पेपर ती विद्याभारती महाविद्यालय या केंद्रावरून देत आहे. शनिवारी तिचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर असल्याने परीक्षा केंद्रावर आली असता, उपजिल्हाधिकारी गणेश पाटील यांची शंकरबाबांनी भेट करून दिली. दरम्यान त्यांनी पुष्पगुच्छ देऊन उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
मालाला व्हायचंय कलेक्टर माला ही दृष्टीहीन असली तरी शिक्षणात पूर्वीपासूनच हुशार आहे. तिला इयत्ता बारावीत ७२ टक्के गुण मिळाले होते. तिला कलेक्टर व्हायचे असल्याचे मानस तिने व्यक्त केला.
पद्मश्रींनी उचलला शैक्षणिक खर्चहनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी माला हिच्या शिक्षणाचे संपूर्ण खर्चाची जबाबदारी सांभाळली. कॉलेज ते वसतिगृहापर्यंत ने-आण करण्याची जबाबदारी सेवानिवृत्त अभियंता प्रकाश खोकले यांनी सांभाळली. माला ही दृष्टीहीन असल्याने परीक्षेदरम्यान तिचे लेखनिकाचे काम राधिका जावळकर व साहिल मुथा यांनी सांभाळले.