अनिल कडू
अमरावती : ब्रेक के बाद बहिरममध्ये प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे जंगी शंकरपट आयोजित केला आहे. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात २१ ते २३ जानेवारीला आयोजित या शंकरपटात मध्य प्रदेशसह राज्यभरातून स्पर्धक सहभागी होणार आहेत. या शंकरपटाची तालीम बहिरममध्ये मागील १० दिवसांपासूनच सुरू आहे. याकरिता मध्य प्रदेशातील काही शौकीन आपल्या बैलजोड्या, गोऱ्हे घेऊन बहिरमात दाखल झाले आहेत. ते आपल्या गोऱ्ह्यांना, बैलजोडीला बहिरमच्या मातीवर सराव देत आहेत. लगतच्या पंचक्रोशीतील काही शौकीनही आपल्याकडील बैलांना, गोऱ्ह्यांना शंकरपटात धावण्याचा सराव देत आहेत.
दोन गटांत स्पर्धा
बहिरम यात्रेतील हा शंकरपट जनरल आणि गावगाडा गट अशा दोन गटांत होऊ घातला आहे. जनरल गटात कुणालाही सहभागी होता येणार आहे, तर गावगाडा गटात चांदूर बाजार आणि अचलपूरमधील स्पर्धकांनाच सहभागी होता येणार आहे. शंकरपटातील जनरल गटात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ५ लाख २७ हजार रुपयांची बक्षिसे जिंकता येणार आहेत, तर गावगाडा गटात १ लाख २४ हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्वतः बच्चू कडू हाकणार जोडी
अचलपूरचे आमदार व शंकरपटाचे आयोजक बच्चू कडू या शंकरपटात जोडी हाकणार आहेत. ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वपूर्ण घटक असलेला शंकरपट हा त्यांचा आवडीचा विषय असून या शंकरपटादरम्यान ते स्वतः हजर राहणार आहेत.