असाईनमेंट
प्रदीप भाकरे
अमरावती : समाज माध्यमांमध्ये शांतता बिघडविणारी किंवा जातीय तेढ निर्माण करणारी पोस्ट अपलोड केल्यास, शेअर केल्यास, पुढे फॉरवर्ड केल्यास जेलची हवा खावी लागते. अलीकडच्या काही घटनांप्रकरणी दाखल झालेले गुन्हे, झालेली अटक पाहता लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपूनच, असे आवाहन सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.
एखाद्या धर्माच्या भावना दुखावतील अशा पद्धतीने मेसेज पोस्ट करणे, एखाद्या तरुण-तरुणीची बदनामी करण्यासाठी फेक प्राेफाईल बनविणे असे सर्व प्रकार फेसबूक, व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून होत असल्याचे समोर येत आहे. असे असताना माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रति अज्ञान आणि आततायीपणा सायबर गुन्हेगारीला आमंत्रण देत असल्याचे दिसून आले आहे.
फेसबूकच्या माध्यमातून बनावट प्राेफाईल तयार करणे, अश्लील कमेंट टाकणे, गोपनीय माहिती चोरल्याच्या विविध सामाजिक माध्यमांबाबत संबंधित सायबर पोलीस ठाण्याकडे आठ महिन्यात १० ते १२ तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी सोशल नेटवर्किंग साईटवर व्यक्त होताना भान बाळगयाला हवे. अन्यथा तुम्हाला जेलची हवा खावी लागू शकते. सध्या सायबर भामटे सक्रिय झाले असून विविध प्रकारे गंडविण्याचे नवनवे फंडे त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा फसव्या मेल तसेच लिंकपासूनही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
//////////
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
सोशल मीडियाचा वापर करताना नागरिकांनी सावधानता बाळगावी. फेक बॅंकिंग ॲप, फेक वेबसाईट, नायजेरियन फ्राॅड, फेसबूक फ्राॅड, क्लोनिंग, आयडेंटिटी चोरी, हनी ट्रॅप अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहे. सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
/////////
मुलींनो, डीपी सांभाळा
मुलींनी फेसबूकवर स्वत:चे प्रोफाईल फोटो ठेवू नये. अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये तसेच प्राेफाईल लॉक करून ठेवावी तसेच व्हॉट्सॲपवर डीपी ठेवताना ‘ओन्ली माय कॉन्टॅक्ट’ या सेटिंगचा वापर करावा, जेणेकरून कुणीही आपला प्राेफाईल फोटो किंवा व्हॉट्सॲप डीपी कॉपी करणार नाही.
////////
सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट; १२ जणांवर गुन्हे
सोशल मीडियावरून बदनामीकारक पोस्ट टाकणे, सायबर पोलीस ठाण्याकडे अलीकडे शहरातील १० ते १२ तक्रारी नोंदविण्यात आल्या. पोलिसांनी त्यांना अटक करून जेलची हवा खाऊ घातली आहे. पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर, एपीआय रवींद्र सहारे हे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरावर वॉच ठेवून आहेत.
//////////////
अशी घ्यावी काळजी
१) अनोळखी ई-मेल्स, फेसबूक फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये.
२) अनधिकृत ॲप डाऊनलोड करू नये.
३) मोबाईलवर येणारे फेक मेसेज, लिंक ओपन करू नका.
४) अनधिकृत साईट, पोर्नोग्राफी साईट ओपन करू नयेत.
/////////
सावधगिरी बाळगाच
कॉपी, पेस्ट व फॉरवर्डच्या नादी लागू नका. पोस्ट करण्यापूर्वी आपल्या छायाचित्राचा, व्हिडीओ कॉलचा दुरुपयोग तर होणार नाही ना, याबाबत खात्री करा. एखाद्या पोस्टमुळे वादंग होणार असेल, तर अशा प्रकारे व्यक्त न झालेलेच योग्य राहील. सामाजिक माध्यमांवर व्यक्त होण्यापूर्वी आपण करतोय ते योग्य आहे का, याची खातरजमा करा.
- सीमा दाताळकर, पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे