लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रसूतीनंतर वेदनेने तडफडत असताना तिला डोळ्यांसमोर साक्षात मृत्यू दिसला. मी मरेन, मी मरेन असे ती वारंवार सांगत होती. प्रसूतीनंतर काही वेळांनी तिला रक्तस्त्रावसुद्धा झाला. मात्र, तेथील डॉक्टरांनी व परिचारिकांनी उपचाराची तसदी दाखविली नाही. त्याचमुळे माझ्या पत्नीचा जीव गेल्याचा आरोप मृताच्या पतीने केला. त्यासंदर्भात जिल्हाधिकारी व विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे गुरुवारी तक्रार देऊन न्यायाची मागणी त्यांनी केली आहे.पूजा सचिन नांदणे ( रा. निरुळगंगामाई ता. भातकुली), असे मृत महिलेचे नाव आहे. तिला २९ जून रोजी सकाळी १२ वाजता दरम्यान प्रसूतीकरिता जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन)मध्ये दाखल केले होते. तिला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्याने पती व नातेवाईकांनी शस्त्रक्रिया (सिझेरीयन) व्दारे प्रसूती करण्याची विनंती येथील डॉक्टरांना केली. परंतु, कुणीही लक्ष दिले नाही. उलट आम्ही डॉक्टर आहोत की तुम्ही, अशी भाषा वापरून दुर्लक्ष केल्याचे पती सचिन नांदणे यांचे म्हणणे आहे. सायंकाळी ७ वाजता दरम्यान पूजाची सामान्य प्रसूती झाली. तिने एका गोंडस बाळाला जन्मही दिला. त्यानंतर तिला वॉर्ड क्रमांक २ मध्ये दाखल करण्यात आले. तिला येथे पुन्हा वेदना सुरू झाल्या. रक्तस्त्रावामुळे ती तडफडत होती. माझा मृत्यू होऊ शकतो, असे ती वारंवार सांगत होती. त्यानंतर पतीने धावपळ करीत स्वत: स्ट्रेचरवर ठेवून तिला वॉर्ड क्रमांक १ मध्ये नेले. परंतु, तेथे डॉक्टर उपस्थित नसल्याने तिला वेळीत उपचार मिळू शकला नाही. अखेर ती रात्री ११.३० वाजता दगावली. एकीकडे मुलगा झाल्याचा पतीला आनंद तर दुसरीकडे बाळाला सोडून पत्नी कायमची निघून गेल्याच्या दु:खाने विव्हळत होते. पत्नीला त्वरित उपचार मिळाला असता तर तिचा जीव वाचला असता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.दोषी डॉक्टर, परिचारिकांवर कठोर कारवाई करामाझ्या पत्नीला प्रसूतीपूर्वी व नंतर वेदना होत असताना तिच्यावर योग्य उपचार करण्याऐवजी आमच्यावर दुर्लक्ष करण्यात आले. याला येथील संबंधित डॉक्टर व परिचारिका दोषी असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करा. माझ्याकडे शेती नाही. मी मजुरी करतो. त्यामुळे बाळाचा पुढील उपचार व तो १८ वर्षांचा होईपर्यंत सर्व खर्च संबंधितांनी पुरवावा, अशी मागणी भोई समाज महासंघाचे सरचिटणीस नंदकिशोर कुयटे, राजेंद्र पारिसे, अरुण नांदणेसह नातेवाईक सचिन नांदणे व इतरांनी केली आहे.तीन परिचारिकांनी ३०० रुपयांची केली होती मागणीतुम्हाला मुलगा झाला आहे. आम्हाला ३०० रुपये द्या, असे येथील कार्यरत नर्सेस माझ्याकडून येऊन ३०० रुपयांची मागणी केली. मी आनंदात त्यांना ३०० रुपयेही दिले. मात्र, पत्नीला वेदना होत असताना याच परिचारिकांनी दुर्लक्ष केले, असे मृत महिलेच्या पतीने सांगितले.सदर महिलेची प्रसूती नॉर्मल व व्यवस्थित झाली. तिचा रक्तदाब वाढला होता. अशा वेळी एकाऐकी पल्मनरी एम्बोलीझम होण्याची शक्यता असते. त्यातूनच तिचा मृत्यू झाला असावा. डॉक्टर व कर्मचारी तेथे उपस्थित होते.- विद्या वाठोडकर, वैद्यकीय अधीक्षक डफरीन
तिला डोळ्यासमोर मृत्यू दिसत होता.. ती विनवण्या करीत राहिली.. पण अखेरीस...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 5:21 PM
तुम्हाला मुलगा झाला आहे. आम्हाला ३०० रुपये द्या, असे येथील कार्यरत नर्सेस माझ्याकडून येऊन ३०० रुपयांची मागणी केली. मी आनंदात त्यांना ३०० रुपयेही दिले. मात्र, पत्नीला वेदना होत असताना याच परिचारिकांनी दुर्लक्ष केले.
ठळक मुद्देडॉक्टर, नर्सेसच्या हलगर्जीपणामुळेच पत्नीचा मृत्यू