अमरावती : व्हॅलेंटाईन विकमधील ‘चॉकलेट डे’ रोजी एका अल्पवयीन मुुलीचा पाठलाग करून तिला प्रेमाचे ‘चॉकलेट’ देण्यात आले. नकार देणाऱ्या तिला मारहाणदेखील करण्यात आली. ९ फेब्रुवारीला अर्थात ‘चॉकलेट डे’ ला अचलपुरात ही घटना घडली. याप्रकरणी अचलपूर पोलिसांनी दिपेश हिरालाल नेतनराव (२१, रा. बोर्डी, ता. अचलपूर) याच्याविरूद्ध ११ फेब्रुवारीला ‘प्रॉमिस डे’ला विनयभंगाच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
तक्रारीनुसार, ती अल्पवयीन मुलगी मागील वर्षी दहावी उत्तीर्ण झाली. आरोपीने तिला गाठत अकरावीत प्रवेश मिळवून देण्याचे बतावणी केली. त्यामुळे दोघांमध्ये मोबाईल संवाद झाला. प्रवेशासाठी त्याने तिची दहावीची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्डदेखील घेतले. मात्र, काहीच दिवसांत त्याचा नूर पालटला. तो प्रेम आणि लग्नाच्या बाता मारू लागला. तुझ्यावर प्रेम करतो, माझ्यासोबत लग्न कर, असा तगादा लावून त्याने आपला पाठलाग केल्याचे पीडिताने म्हटले आहे. शहरात बाहेर पडली, की तो तिचा पाठलाग करायचा. शारीरिक संबंध ठेवण्यास देखील प्रवृत्त व दबाव टाकत होता.
मारण्याची धमकी, विनयभंग
९ जुलै २०२१ ते ९ फेब्रुवारी २०२२ रोजीच्या रात्री ८ वाजतादरम्यान त्या विविध प्रसंगांना आपण सामोरे गेल्याचेे त्या मुलीने म्हटले आहे. शरीरसंबंधास नकार दिल्याने त्याने तिचा विनयभंग केला. ९ फेब्रुवारीला रात्री ८ नंतर त्याने तिला थापडा बुक्क्यांनी मारहाण केली तथा मारण्याची धमकी देखील दिली. या सर्व प्रकाराने हवालदिल झालेल्या त्या मुलीने पालकांना विश्वासात घेऊन आपबिती कथन केली. त्यांनी तिला बळ दिले. अखेर ११ फेब्रुवारीला दुपारी २.३० तिने अचलपूर पोलीस ठाणे गाठले.