शिंदी बु. : परतवाडा येथील प्रादेशिक वनविभागाच्या अधिकारात येणाऱ्या वसाहतीतील निवासस्थाने अनेक अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त होऊनही त्यांच्याच ताब्यात आहेत. त्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांना भाड्याचे घर शोधावे लागत आहे.
वनविभागात कार्यरत असणाऱ्या वनरक्षक, वनपाल, वनमजूर, लिपिक यांना शासनाकडून शासकीय वसाहतीत राहण्याची व्यवस्था केली जाते. परंतु, परतवाडा येथील निवासस्थाने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ताब्यात आहेत. ही निवासस्थाने वितरित करण्याची जबाबदारी हे उपवनसंरक्षकांच्या अखत्यारीत येत असताना, याविषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले जात आहे, असा प्रश्न येथील निवासस्थानाची गरज असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पडला आहे.
सन २०१८ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताब्यातील ही निवासस्थाने केव्हा मोकळी केले जाणार, असा प्रश्नही आता उपस्थित झाला आहे. याविषयी येथील कर्मचाऱ्यांनी संबंधित विभागाकडे अनेक तक्रारी केल्या. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन ही निवासस्थाने मोकळी करावी, अशी मागणी कार्यरत कर्मचाऱ्यांनी केली आहे.