बडनेराच्या आॅटोचालक मुस्लीम महिलेचा आदर्शबडनेरा : चूल आणि मूल इतकेच महिलांचे कार्यक्षेत्र असा रूढ समज असलेल्या समाजात जन्माला येऊनही मुलांच्या शिक्षणासाठी परंपरांची चौकट अव्हेरून तिने चक्क आॅटोरिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला आणि अंमलातही आणला. पुरुषप्रधान संस्कृतीला आव्हान देत स्त्रियादेखील हा व्यवसाय करु शकतात, असे या जिगरबाज मुस्लीम महिलेने समाजाला दाखवून दिले आहे. घरची परिस्थिती बेताचीच. परंत मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे, हे स्वप्न उराशी बाळगले. त्यातूनच मिलचाळ परिसरातील शबाना परवीन अब्दुल जलील हिने चक्क आॅटोरिक्षाचे स्टेअरिंग हाती धरले. सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीदिनापासून शबानाने आॅटोरिक्षा चालविणे सुरू केले आहे. ही महिला लग्नापूर्वी बारावीपर्यंत शिकली आहे. शिक्षणाची आवड असणाऱ्या शबानाचे लग्न अल्पवयात झाले. स्वत:चे शिक्षण पूर्ण न करु शकणाऱ्या शबानाने मुलांना शिक्षण द्यायचेच, असे ठरविले आहे. तिचा पती सिक्युरिटी गार्डचे काम करतो. एकट्याच्या उत्पन्नात मुलांचे शिक्षण व कुटुंबाचे पालन पोषण करणे शक्य नसल्याने शबानाने हा निर्णय घेतला. तिला मुमताज नावाची मुलगी असून ती बीए करीत आहे. शबानाने आॅटोरिक्षाचा परवाना काढला आहे. भाड्याने आॅटोरिक्षा घेऊन सध्या शबाना संसाराचा गाडा रेटत आहे. स्वत:चे वाहन घेण्याची तिची आर्थिक कुवत नाही. पण, कमालीची जिद्द आणि चिकाटी बाळगणाऱ्या शबानाला याची खंत नाही. ती म्हणतेच अर्थार्जनाचा कोणताही सन्मानजनक मार्ग महिलांना वर्ज्य नाही. महिलांनी या क्षेत्रातही पुढे यावे.
मुलांच्या शिक्षणासाठी तिने झुगारली रुढी, परंपरेची चौकट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2016 12:07 AM