पोहरा : वडाळी वनपरिक्षत्र अंतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील उत्तर चोरआंबा बीट वनखंड क्रमांक ७८ या वनक्षेत्रात शुक्रवारी अचानक लागलेल्या आगीत एक हेक्टर वनक्षेत्र जळाले. या वनक्षेत्रातील आग भडकण्यापूर्वीच बीट वनरक्षक तेजस्विनी ठाकरे यांनी पळसाच्या हिरव्याकंच फांद्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले.
आग विझविण्यासाठी आधुनिक साहित्य उपलब्ध नसल्याने एकट्या महिला वनरक्षकाने पारंपरिक पद्धतीने पळसाच्या मोठ्या फांद्यांच्या साहाय्याने वणव्यापासून जंगलाचे रक्षण करण्याकरिता प्रयत्नांची पराकाष्ठा केली, हे विशेष. आगीत एक हेक्टर वनक्षेत्राचे नुकसान झाले. पोहरा वर्तुळातील हिवाळ्यात पेटणारा वणवा हा मानवी हस्तक्षेपामुळे असून, कुणी तरी खोडसाळपणे जंगलात आग लावली असावी, असा कयास वनविभागाने वर्तविला आहे.
वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात उत्तर चोरआंबा बीटवनरक्षक तेजस्विनी ठाकरे यांनी जळालेल्या क्षेत्राची पाहणी करुन पुढील कारवाईस प्रारंभ केला.
बॉक्स
पोहरा वर्तुळातील तीन बीट वणव्याच्या विळख्यात
उन्हाळ्यापूर्वी, थंडीच्या दिवसांतच आतापर्यंत पोहरा वर्तुळाच्या सात बीटपैकी पोहरा बीट, उत्तर चोरआंबा बीट, परसोडा बीट येथे आगी लागल्याच्या घटना घडल्या. यात वनसंपदेचे नुकसान झाले आहे.