फोटो - पोहरा बंदी २५ पी
पोहरा बंदी : जंगलाचे संरक्षण आणि गुरे व मेंढ्या जंगलातून कायम हद्दपार करण्यासाठी चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी भानुदास पवार यांनी दोन दिवसांपासून ‘सर्जिकल स्ट्राइक’ राबवून जंगल गस्त करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यादरम्यान चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिरोडी वर्तुळातील सावंगा बीट वनखंड क्रमांक ३०७ मधील राखीव जंगलात मेंढ्या व बकऱ्यांचा कळप चराई करताना आढळताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या पथकाने धडक कारवाई केली. वनकर्मचाऱ्यांचे पथक पाहून मेंढपाळ मेंढ्या जंगलातून बाहेर काढण्यात यशस्वी ठरले. तरीसुद्धा चिरोडी वर्तुळातील वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन मेंढ्या ताब्यात घेतल्या व त्या वाहनाने चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालयात आणून बंदिस्त केल्या. शनिवारी ही कारवाई चिरोडी प्रभारी वर्तुळ अधिकारी किशोर धोत्रे, वनरक्षक अतुल धसकट, वनमजूर शेख रफीक, शालिक पवार, संरक्षण मजूर प्रमोद राठोड यांनी गस्तीदरम्यान केली. वनरक्षक अतुल धसकट यांनी दोन मेंढ्यांसह उर्वरित पळवून नेलेल्या मेंढ्याप्रकरणी पशुपालकांवर वनगुन्हा जारी केला.