ठाणेदाराचा हेतू काय ? : आरोपींना सोडलेच कसे ?गणेश देशमुखअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात नरबळीचा प्रयत्न करणाऱ्या सुरेंद्र मराठे, नीलेश ऊके आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराने गुन्हा कबूल केल्यानंतरही मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार शैलेश शेळके यांनी तिघांनाही सोडून दिले. आरोपींवर गुन्हा दाखल न करणे, फरार होण्याची, पुरावे नष्ट करण्याची पूर्ण संधी उपलब्ध करून देणे या दोषांसाठी शैलेश शेळके यांना निलंबित का करण्यात येऊ नये?प्रथमेश हा इमारतीवरून पडला असावा, त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा- अशा कारणांमागे लपून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्रामीण पोलिसांनी 'लोकमत'च्या शोधमोहिमेनंतर गांभीर्याने तपास सुरू केला. पाचवीतील प्रथमेश स्वत:चा गळा कापणे कसे शक्य नाही, याबाबत 'लोकमत'ने लोकदरबारात भूमिका मांडल्यावर पोलिसांनी तो हल्लाच असल्याचे कबूल केले. सात आॅगस्टच्या घटनेनंतर चार-पाच दिवस टोलवाटोलवी केल्यानंतर १२ आॅगस्ट रोजी पोलिसांना सुरेंद्र मराठे, नीलेश ऊके आणि एका अल्पवयीन मुलाने हे कृत्य केल्याचा गुन्हा मान्य केला. आश्रम परिसरात संबंधितांनी हा गुन्हा मान्य केल्यानंतर आश्रमातील पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. ठाणेदार शैलेश शेळके यांच्यासमोर तिघांना पेश करण्यात आले. ठाणेदारासमोर तिघांनीही पुन्हा गुन्हा कबूल केला. गुन्हा कबूल केल्यावर ठाणेदार शेळके हे तिघांनाही दुपारी ३ च्या सुमारास आश्रमातून मंगरूळ दस्तगीर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. त्यांना मारहाण केली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी तिघांनाही पुन्हा आश्रम परिसरात आणून सोडले. नरबळीचा गंभीर गुन्हा कबूल करूनदेखील शेळके यांनी गुन्हा दाखल न केल्याने त्यांच्या हेतुबाबत शंका निर्माण होते. गुन्हा कबूल करणारे तिन्ही आरोपी खोटे बोलतात. आश्रम व्यवस्थापनाने खऱ्या आरोपींना लपविण्यासाठी यांना मोहरे बनविले, अशी शंका शेळके यांना येऊ शकते.
- हे तर शेळकेंना अभय !
By admin | Published: August 20, 2016 11:56 PM