विदर्भातील उत्कृष्ट पालिका : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश प्रदान शेंदूरजनाघाट : महाराष्ट्र राज्य प्रथम नगरविकास दिनानिमित्त राज्यातील उत्कृष्ट नगर पालिकांचा गौरव सोहळा गुरूवारी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विदर्भातील सर्वोत्कृष्ट पालिकेचा प्रथम अडीच कोटींचा पुरस्कार शेंदूरजना घाट नगर पालिकेला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. वरूड-मोर्शी मतदारसंघाचे आ.अनिल बोंडे, शेंदूरजना घाटचे नगराध्यक्ष रुपेश मांडवे, मुख्याधिकारी संजीव ओहळ आदींनी हा पुरस्कार स्वीकारला. नगरविकास दिवस राज्य शासनाच्यावतीने यंदा प्रथमच साजरा करण्यात आला. राज्यातील नगरपालिकांना प्रोेत्साहन मिळावे, या उद्देशाने त्यांना सन्मानित करण्याचे ध्येय नगर विकास विभागाने ठेवले होते. त्यादृष्टीकोनातून शेंदूरजना घाट नगर पालिकेने सर्वंकष प्रयत्न केले. नागरिकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्याचा प्रयत्न केला. उत्कृष्ट नगर परिषदेसाठी १०० गुणांचे निकष ठेवण्यात आले होते. त्याअंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत केलेली कारवाई, घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेली कारवाई तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, करवसुली व इतर स्त्रोतांपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठ्याचा दर्जा, नागरी दुर्बल घटकाच्या योजनांची अंमलबजावणी, वृक्षगणना, वृक्षलागवड व पालिकेने केलेली लोकसहभागातील कामे इत्यादींचे मूल्यमापन करण्यात आले. हे सर्व निकष पूर्ण केल्यामुळे शेंदूरजना घाट नगर परिषद विदर्भात अव्वल ठरली आहे. हे यश संपादन करण्यासाठी नगराध्यक्ष रूपेश मांडवे, उपाध्यक्ष धनराज अकर्ते, पाणीपुरवठा सभापती विशाल सावरकर, बांधकाम सभापती अनिस खान शेर खान, सुभाष गोरडे, सतीश अकर्ते, भुपेंद्र कुंवारे, मंगल पंधराम, राकेश दवंडे, जयप्रकाश भोंडेकर, गजानन कपले, रेखा अढाऊ, नीलिमा कांडलकर, सुनीता वंजारी, मोनिका भोंगाडे, सारिका बेलसरे, मंदा वसुले, जया श्रीराव, हर्ष घोरपडे, राजश्री डोईजड, मुख्याधिकारी संजीव ओहळ आदींनी प्रयत्न केलेत. (वार्ताहर)
शेंदूरजना पालिकेला अडीच कोटींचा पुरस्कार
By admin | Published: May 05, 2017 12:14 AM