मोहन राऊत
अमरावती : घरी अठराविश्वे दारिद्र्य असते. दररोज शेतात गेल्याशिवाय पोटात अन्नाचा कण पडत नाही. मात्र, मनात शाळेत जाण्याची इच्छा असूनही जाता येत नाही. त्या बालमजुरांची भयावह व्यथा मांडणारा ‘शिकू दे देवा’ हा लघुपट धामणगाव रेल्वे तालुक्यातील दाभाडा या गावातील चिमुकल्यांनी साकारला आहे.
धामणगाव तालुक्यात अद्यापही हातावर आणून पानावर खाणारी अनेक कुटुंबे आहेत. लाॅकडाऊनच्या काळात या कुटुंबांना अधिकच फटका बसला. दरम्यानच्या काळात अनेक चिमुकले शाळेची पायरी चढले नाहीत. वडिलांसोबत शेतात गेल्याशिवाय पर्याय नसल्यामुळे बालमजुरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे दाभाडा, वसाड व गव्हा निपाणी या गावांमधील युवकांनी या लघुकथेतून शैक्षणिक जीवनाचे महत्त्व सर्वांना कळावे, शिक्षणाने माणसाचा उद्धार कसा होतो, शिक्षणासाठी करावा लागणारा संघर्ष व पिढ्यानपिढ्या मजुरी करणाऱ्या मजुरांचा संघर्ष मांडला आहे.
लघुकथेची संकल्पना सुहास ठोसर यांची, तर दिग्दर्शन लीलाधर भेंडे यांचे आहे. आशिष ठोसर, मयूर जुनघरे, प्रेम भेंडे, अभिजित खातखेडे, अरुण जुनघरे, बंडू हेंबाडे, रोशन इंगळे, पवन सावंत, मनीष ठाकरे, कपिल उइके, वेदांत वसू, वैभव जाधव, अभय जुनघरे, आलोक उचके यांनी अभिनय केला आहे. सागर ठाकरे व प्रमोद भेंडे यांनी संगीत संयोजन केले आहे.
...अशी आहे लघुकथा
गावातील शाळेत अनेक विद्यार्थी जात असताना आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे या चिमुकल्यांना शेतात कामाला जावे लागते. त्यात शाळेत जाण्याची मनात इच्छा असूनही ते जाऊ शकत नाहीत. शेतात गेल्यानंतर शेतमालक अधिक काम करून घेतो. दिवाणजी या बालकामगारांना पुस्तके आणून देतात. हे बालकामगार काम सोडून अभ्यास करताना शेतमालकाला दिसतात. तो त्यांना मारहाण करतो. मात्र, आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चात्ताप होतो आणि सर्व चिमुकल्यांना शाळेत प्रवेश देतो.