- मोहन राऊत अमरावती : दिवाळीच्या पाडव्याला विदर्भातील पाच हजार गावांत शुक्रवारी ढाल पूजन उत्सव साजरा करण्यात आला़ डफळीची ताल व दाद-याच्या निनादात आदिवासी गोवारी युवकांनी गोहळा-गोहळीचे नृत्य सादर केले़चकाचका चांदणी वो गोवारीयो बिनो़, गायनेसे कोटा भरे, घरघर देबो आशिष गा़़़ असा दादºयाचा निनाद घेत युवकांनी या उत्सवाला सुरुवात केली़ सकाळी गावातील पाळीव पशुंना सजविण्यात आले. सायंकाळी सर्व गाईगुरांना गावातून फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाईला हंबरेपर्यंत नाचवण्यात आले.दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी दोन बाशांवर फाडक्या बांधून पुरुष ढाल म्हणजे गोहळा, तर स्त्री ढाल म्हणजे गोहळी उभारण्यात आली होती़शुक्रवारी दुपारी प्रथम ढाल सुताराच्या घरी पाणी पिण्याकरिता नेण्यात आली. यानंतर आदिवासी गोवारी नृत्याला प्रारंभ झाला़ डफळी व मुरलीच्या निनादात दाद-याची मैफल रंगल्याने नृत्यात अधिकच रंगत आली़ पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला़गोंडी धर्माची रक्षण करणारी ढालढाल ही गोंडी धर्माची रक्षण करणारी असून, ती कदंब वृक्ष, काटसावरी व मोहाचे झाड यापासून तयार करण्यात आली. गोंडी धर्माचा धर्मगुरू कोपाल वंशाचा होता़ कोपाल म्हणजे गोवारी. गोंडी धर्माची स्थापना त्याकाळी शंभू गवारी यांनी केली. तेव्हापासून हा उत्सव सुरू आहे़अमरावती, यवतमाळात जल्लोषअमरावती जिल्ह्यातील २८ गावांत, तर धामणगाव तालुक्यातील विटाळा, कावली, कामनापूर घुसळी यांसह आठ गावात ढाल पूजन करण्यात आले़ विटाळा येथील सरपंच मंगेश ठाकरे, उपसरपंच नितीन वाघाडे, लक्ष्मण ठाकरे, प्रीतम ठाकरे, जगन राऊत यांनी गुराखी नंदू जानराव चचाणे यांच्या घरी, यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथे दवीदास कोयरे यांच्याकडे अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष डॉ़विवेक चौधरी, सचिन चचाणे, मनोहर शहारे, रामदास नेवारे, राजाभाऊ ठाकरे, शामा कोलाम ब्रिगेडचे अध्यक्ष शैलेश गाडेकर यांच्या उपस्थितीत उत्सव पार पडला. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आगामी पाच दिवस हा उत्सव साजरा करण्यात येत आहे़ आदिवासींची परंपरा जोपासण्यासाठी गोवारी युवकांनी या जिल्ह्यात पुढाकार घेतला आहे़
विदर्भात रंगला ढाल पूजन उत्सव, दोन दिवस चालणार उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 4:47 AM