‘ईडी’ सरकारने जाहीर माफी मागावी, अन्यथा मराठा समाज.. वादग्रस्त वक्तव्यावर नाना पटोलेंचा संताप
By गणेश वासनिक | Published: September 26, 2022 05:13 PM2022-09-26T17:13:10+5:302022-09-26T17:21:26+5:30
तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर नाना पटोले आक्रमक
अमरावती : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात मराठा समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. राज्याच्या ‘ईडी’ सरकारने जाहीर माफी मागावी. तसेच बेताल वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंत यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अन्यथा मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवेल. असा सणसणीत टोला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती येथे पत्रपरिषदेतून भाजपला लगावला.
नाना पटोले गत दोन दिवसांपासून अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका केली. राज्यातील ‘ईडी’ सरकार हे दिल्लीच्या ईशाऱ्यावर चालत आहे. मोदी-शहांच्या आदेशानुसार मंत्रिमंडळाचे वाटप झाले. म्हणूनच एका मंत्र्यांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद सोपविले, अशी टीका त्यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे गुजरात दौऱ्यावर गेल्याबाबत नाना पटोले यांनीआता राज्य सरकारला प्रत्येक गोष्ट गुजरातलाच विचारून करावी लागेल. त्यामुळेच महाराष्ट्रातून दीड लाख लोकांना रोजगार देणारा वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प मोदी-शहा यांना सहजतेने पळवून नेता आला, असे ते म्हणाले.
राज्य सरकारने तानाजी सावंत प्रकरणी माफी मागावी, अन्यथा हा मुद्दा आगामी विधानसभेत उपस्थित करून सरकार बरखास्त करण्याची मागणी करू, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. मोदी सरकार शेतकरी, बेरोजगारी, युवकांचे प्रश्न, समस्यांबाबत बोलत नाही, अशी टीका केली.
यावेळी माजी मंत्री ॲड. यशेामती ठाकूर, महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, आमदार बळवंत वानखडे, वजाहत मिर्झा,डॉ. सुनील देशमुख, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलु देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष बबलु शेखावत, माजी महापौर विलास ईंगोले, डॉ.अंजली ठाकरे आदी उपस्थित हाेते.