अमरावती : राज्यातील एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांचे सरकार अस्थिर आहे. एकाच मंत्र्यांकडे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद आहे. यावरून सरकारची अवस्था स्पष्ट होत आहे, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली.
काँग्रेसचे खासदार व नेते राहुल गांधी सध्या भारत दौऱ्यावर असून ही पदयात्रा लवकरच महाराष्ट्रात पोहोचणार आहे. पदयात्रेच्या पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी अमरावती येथे आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी बंडखोर शिवसेना नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारवर टीका केली.
पटोले पुढे बोलताना म्हणाले, राहुल गांधी यांच्या पदयात्रेमुळे आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना मशिद, मदरशात जावे लागले. यावरून भारत जोडो पदयात्रा यशस्वी झाल्याचे हे द्योतक आहे. भाजपचा आयटी सेल, मोदी मीडियाला उत्तर देण्यासाठी काँग्रेस आता सक्षम होत आहे. कार्यकर्त्यांनी आता खमकेपणाने पुढे यावे, असे आवाहन पटोले यांनी केले.
या वेळी मंचावर माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, आ. बळवंत वानखडे, आ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी आ. वीरेंद्र जगताप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, किशोर बोरकर, माजी महापौर विलास इंगोले, डॉ. अंजली ठाकरे आदी उपस्थित होते.
लोकसभा, बडनेरा विधानसभा काँग्रेसकडे
लोकसभा, बडनेरा विधासभेच्या जागांवर काँग्रसेचे उमेदवार असतील, मनपा निवडणुकीसाठी शहराचे सर्वेक्षण करून तिकीट वाटप केले जाईल, असे पटोले म्हणाले.
पालकमंत्री की स्पायडरमॅन ?
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सहा जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आहेत. ते 'स्पायडरमॅन'सारखे काम करणार आहेत का, असा प्रश्नही त्यांनी केला.