रिद्धपूर : शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत रिद्धपूर, अडगाव, राजुरवडी येथील बऱ्याच दिवसापासून अवैध देशी दारू सर्रास विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच नव्याने रुजू झालेले ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात धाडसत्र राबविण्यात आले. यामध्ये ७६६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विक्रांत पाटील यांनी २८ आगस्ट रोजी शिरखेड ठाण्याचा पदभार स्वीकारताच सर्व बीट जमादारांकडून अवैध देशी दारू विक्री होणाऱ्या गावांची माहिती जाणून घेत हे धाडसत्र राबविण्याचे निर्देश पथकांना दिले. यात रिद्धपूर येथे १ सप्टेंबर रोजी पोलीस कर्मचारी अनूप मानकर, छत्रपती करपते यांना प्रमोद भीमराव वानखडे हा अवैध देशी दारू बाजारात विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून अंदाजे ४० अवैध देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. रजूरवाडी येथे ३१ ऑगस्ट रोजी पोलीस कर्मचारी मनोज टप यांनी संतोष अर्जुन इंगळे याच्याजवळून ४८ देशी दारूच्या बाटली जप्त केल्या. तसेच २ सप्टेंबर रोजी आडगाव येथून मंगेश सुखदेव इंगोले, अमोल रंगराव मोहड यांच्याकडून १४ नग दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या संयुक्त कारवाईत एकूण ७६६० रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहे.
कोट
शिरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गावातील अवैध धंदेवाईकांविरूद्ध माहिती घेणे सुरू आहे. ही मोहीम सुरूच असून अवैध धंदेवाईकांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.
- विक्रांत पाटील, ठाणेदार, शिरखेड पोलीस ठाणे