अंजनगाव सुर्जी - शिवसेनेतून बंडखोरी करीत शिंदे गटात सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर यांना रविवारी अंजनगाव सुर्जी येथे शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्या वाहनाच्या काचांवर चपलांचा मारा करण्यात आला. बुक्क्यांचे प्रहारदेखील शिवसैनिकांनी केले. त्यापूर्वी त्यांच्या नियोजित मार्गावर ‘पन्नास खोके...’ची नारेबाजी करण्यात आली.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी घेतला होता. दुसऱ्या दिवशीच एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिवसेनेतून सर्वात शेवटी ते शिंदे गटात सामिल झाले होते. ते २५ सप्टेंबरला अंजनगाव सुर्जी येथील देवनाथ मठात दर्शनासाठी आले होते. दुपारी ३ वाजता ते मठात दर्शनाकरिता आल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनीक लाला चौकात गोळा झाले.
सायंकाळी ६ च्या सुमारास ते मठातून दर्शन करून निघाले असता शिवसैनिकांनी ताफ्यातील त्यांचे वाहन हुडकून अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वाहनावर हल्लाबोल करीत नारेबाजी केली. आमदार बांगर यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे, हे कळले नाही. त्यांचे वाहन न थांबविता घटनास्थळाहून काढण्यात आले. या घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती.