वरुड (अमरावती) : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यात चांगलाच राजकीय भूकंप आला आहे. शिंदेंसोबत ४० आमदार बंडामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे. या बंडखोर आमदारांविरोधात राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून, वरुडमध्येही सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात निषेध आंदोलन करत बंडखोर आमदारांवर रोष व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विधानसभेत प्रतिनिधित्व दिले. शिवसेनेच्या माध्यमातूनच हे कार्यकर्ते आमदार आणि मंत्री झालेत. परंतु याच आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेविरुद्ध एकनाथ शिंदेंसह चाळीस आमदारांनी बंड पुकारून शिवसेनेशी गद्दारी केली आहे. त्यामुळे राज्यात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला आहे. परंतु अशा संकटग्रस्त परिस्थितीमध्येही वरुडमधील शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पाठीशी उभे असल्याचे सांगत, बंडखोर आमदाराचा निषेध करून असंतोष व्यक्त केला. यावेळी बंडखोर आमदारांविरुद्ध प्रचंड नारेबाजी करण्यात आली.