आंदोलन, होळी पूजनाला चपलांचा हार घालून केला हिंदू संस्कृतीचा अपमान
अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू असताना या आदेशाचे उल्लघंन करीत हिंदू संस्कृतीला काळिमा फासत होळीला चपलांचा हार घालून होलिका दहन करणाऱ्या खासदार, आमदार असलेल्या राणा दाम्पत्याच्या पोस्टरला संतप्त शिवसैनिकांनी चपलांनी बदडत संताप व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना महानगर व जिल्ह्याच्या वतीने राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मंगळवारी निवेदनाद्वारे केली आहे.
दिवंगत दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी शिवकुमार यांचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. आदिवासी बांधवांनी शिवकुमार व रेड्डी यांच्या प्रतिमेला चपलांनी मारले आणि निषेध व्यक्त केला आहे; परंतु खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मेळघाट दौऱ्यात होळीपूजन ऐवजी होळीलाच चपलांचा हार घालून हिंदू व आदिवासी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप शिवसेनेचे महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी केला आहे. त्यामुळे दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या शिवकुमार व रेड्डी यांच्यावर कठोर कारवाई करून फासीची शिक्षा द्यावी. दीपाली चव्हाण यांना वन शहीद म्हणून सन्मान द्यावा. खासदार व आमदार राणा दाम्पत्याने होळी पूजनाऐवजी चपलांचा हार घालून हिंदू संस्कृतीचा अपमान केला आहे, त्यामळे राणा दाम्पत्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शिवसेनेचे महानगर प्रमुख पराग गुडधे, जिल्हाप्रमुख सुनील खराटे, प्रदीप बाजड, आशिष धर्माळे, विकास शेळके, धाने पाटील, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, विजय ठाकरे, दिनेश चौधरी, शाम धाने पाटील, आदींसह पदाधिकारी व शिवसैनिकांनी केली आहे.