इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे काँग्रेसची जागा शिवसेनेला - नाना पटोले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 11:44 AM2023-01-13T11:44:01+5:302023-01-13T11:50:38+5:30

अमरावतीत महाविकास आघाडीचा मेळावा

Shiv Sena gets Congress seat in Amravati Division Graduate Constituency | इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे काँग्रेसची जागा शिवसेनेला - नाना पटोले 

इच्छुकांच्या भाऊगर्दीमुळे काँग्रेसची जागा शिवसेनेला - नाना पटोले 

Next

अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसमध्ये अनेकजण उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी काँग्रेसच्या वाट्याची जागा शिवसेनेला देण्यात आली असून, हा उमेदवार महाविकास आघाडीचा असल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथेे दिली.

पंचवटी चौकानजीकच्या एका मंगल कार्यालयात आयोजित महाविकास आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात ते मार्गदर्शन करताना बाेलत होते. गत काही दिवसांपूर्वी मी अमरावती येथे येऊन गेलो. काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, इच्छुकांसोबत संवाददेखील साधला. पदवीधर निवडणुकीसाठी चार ते पाच सक्षम उमेदवार काँग्रेसकडे होते. मात्र, ही निवडणूक लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी असल्याने महाविकास आघाडीत एकमताने ठरल्याप्रमाणे काँग्रेसच्या वाट्याची जागा शिवसेनेला देण्यात आली आहे. धीरज लिंगाडे हे महाविकास आघाडीचे अमरावती पदवीधर उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला यावा, यासाठी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे, असे आवाहन पटोले यांनी केले. लिंगाडे हे मूळचे काॅंग्रेसवासी आहेत. ते शिवसेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष असले तरी महाविकास आघाडीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेसमध्ये किंतु परंतु नाही, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

यावेळी मंचावर आ. नितीन देशमुख, आ. ॲड. अभिजित वंजारी, आ. बळवंत वानखडे, आ. वजाहत मिर्झा, धीरज लिंगाडे, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, प्रा. वसंत पुरके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी आ. राहुल बोंद्रे, वीरेंद्र जगताप, आदी महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena gets Congress seat in Amravati Division Graduate Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.