पान १ साठी
फोटो पी २७ तिवसा
तिवसा : अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा बस स्थानकजवळील आशीर्वाद वाईन बारसमोर शनिवारी रात्री १०.१५ वाजता शिवसेनेचे तिवसा शहरप्रमुख अमोल पाटील यांची डोळ्यांत मिरचीपूड टाकून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे.
अमोल पाटील यांच्यावर यापूर्वी दोन हत्या केल्याचा आरोप होता. दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर तडीपाराचा आदेशदेखील काढला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, तर आरोपी पसार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल जनार्दन पाटील (३८, रा. तिवसा) असे मृताचे नाव आहे. तो शिवसेना शहरप्रमुख होता. रात्री अमोल पाटील हा आपल्या एका मित्रासोबत दारू पिण्यास आशीर्वाद बारमध्ये आला होता,दरम्यान आरोपींनी अमोल पाटील यांच्या हत्येचा आधीच कट रचला होता. सुरुवातीला आरोपींना अमोलच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने सपासप वार करीत त्याला जागीच ठार केले.
दरम्यान, घटनेविषयी माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रीता उईके ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी वेगाने चक्र फिरवत काही तासांतच चार आरोपींना वर्धा जिल्ह्यातील तळेगाव श्यामजीपंत येथून अटक केली, तर एक आरोपी पसार असल्याची माहिती उईके यांनी दिली. अटक केलेल्या आरोपींमध्ये संदीप रामदास ढोबाळे (४२), प्रवीण रामदास ढोबाळे, प्रवीण ऊर्फ अविनाश एकनाथ पांडे (३०), रूपेश ऊर्फ अंकुश रमेश घागरे (२२, सर्व रा. तिवसा) यांचा समावेश आहे. गुणवंत उमप (३०, रा. कमळापूर) हा पसार झाला आहे. आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३०२, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब), ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
बॉक्स
अमोल पाटील याची हत्या जुन्या वादातून झाली आहे. यापूर्वी त्याला दोन हत्याप्रकरणात अटक झाली होती. तो अवैध रेतीच्या व्यवसायात गुंतला होता तसेच त्याचा बीअर बार होता. त्याची हत्या नियोजबद्ध रीतीने करण्यात आली. आरोपी अविनाश पांडे यांनी आशीर्वाद बारमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते, असे पोलिसांच्या निदर्शनास आले. रात्रीच घटनास्थळी दाखल होत उपविभागीय पोलीस अधिकारी जितेंद्र जाधव यांनी घटनेविषयी माहिती घेतली.
बॉक्स
तिवसा येथे गेल्या आठ महिन्यांपूर्वी अजय दलाल (२७, रा. तिवसा) याचादेखील भरदिवसा खून झाला होता. आता पुन्हा जुन्या वैमनस्यातून थेट शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
कोट
सदर हत्या जुन्या वादातून झाली आहे. मृताचा तडीपारीचा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जारी केला होता. मात्र, त्याला स्थगिती मिळून विभागीय आयुक्तांनी सुनावणी ठेवली होती. आरोपीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. चौघांना अटक केली आहे.
- रीता उईके, पोलीस निरीक्षक, तिवसा