लोकमत न्यूज नेटवर्क अंजनगाव सुर्जी : रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन तब्बल १८ युवकांची एकूण १ कोटी ५६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली. याप्रकरणी १४ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार याच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस सूत्रांनुसार, फिर्यादी मंगेश वसंतराव हँड (३८, रा. रामटेकपुरा, अकोट) यांच्या तक्रारीनुसार, मंगेशची योगेशसोबत डिसेंबर २०२१ ला ओळख झाली. एका माजी आमदारामार्फत रेल्वे विभागात नोकरी लावून देतो. त्याकरिता एकूण दहा ते पंधरा जण लागतील. तुम्हाला खर्च करावा लागेल, अशी बतावणी मुन्नाने केली. मंगेशने त्याचे काही नातेवाईक व मित्रांना सोबत घेतले. मुन्नाच्या सांगण्यावरून परतवाडा येथील विलास गोवर्धन जाधव (रा. परतवाडा) तसेच श्रीकांत बाबूराव फुलसावंदे (रा. राजुरा) यांच्याकडे काही रक्कम देण्यात आली. कोटक महिंद्रा बँकेच्या त्रिमूर्तीनगर (नागपूर) येथील खात्यात आरटीजीएसद्वारे ही रक्कम जमा केली.
भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे युवकांची वैद्यकीय तपासणी आटोपली. त्यांची लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत अंजनगाव सुर्जी येथे भेट घालून देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार २३ जानेवारी २०२२ ला मुन्नाने अंजनगाव येथे एका फ्लॅटवर नेऊन श्रीकांत फुलसावंदे, विलास गोवर्धन जाधव (रा. परतवाडा), मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंह चौहान ठाकूर (रा. मसाजगंज, अमरावती) यांच्यासोबत रेल्वे अधिकारी म्हणून भेट घालून दिली. त्यांनी सर्वाची कागदपत्रे पाहिली. त्यानंतर सर्वांनी मुन्नाच्या घरी आणखी रक्कम दिली.
४ विरुद्ध गुन्हा योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव व मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर यांच्याविरुद्ध कलम ४१७, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार प्रकाश अहिरे पुढील तपास करीत आहेत.
थेट जॉइनिंग लेटर मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव, मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंग चव्हाण यांनी सर्वांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही. आम्ही तुमची ऑर्डर काढतो. त्यानुसार सर्वांच्या पत्त्यावर जॉइनिंग लेटर घरी पोस्टाने पाठवले गेले. तथापि, सर्वांनी मुंबई गाठली त्यावेळी अधिकारी सुट्टीवरून परतल्यानंतर जॉईन करण्यात येईल, असे सांगितले गेले.
अशी उकळली रक्कम नीलेश बोडखेकडून १५ लाख, पवन ताळे, सतीश वडाळे, दिनेश सावरकर, प्रल्हाद थोरात, गणेश रेखाते, आदित्य पाकधुणे, अक्षय लोणारे, प्रशांत लाडोळे, सुनीता इंगळे या नऊ जणांकडून प्रत्येकी १० लाख रुपये, मयूर नेमाडेकडून ९ लाख ५० हजार, मंगेश हेंड व विजय दातीर यांच्याकडून प्रत्येकी नऊ लाख, सूरज हटवारकडून आठ लाख, महेंद्र पाखरेकडून सहा लाख, जोशना हेंडकडून पाच लाख, आशिष धर्माळेकडून तीन लाख, गव्हाळे अडीच लाख असे एकूण १ कोटी ५६ लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
जिवे मारण्याची धमकी फसवणूक लक्षात येताच मुन्ना इसोकार वगळता इतर तिघांना गाठले. चौघांनीही तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, आमचे सरकार आहे, अशी धमकी देत त्यांनी युवकांना शिवीगाळ केली.