अमरावती : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नऊ कार्यकारी पदाधिकाऱ्यांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, पाच क्रमांकाच्या मतदान केंद्रावर मतदारांना प्रलोभन देण्यावरून विकास आणि प्रगती पॅनलच्या उमेदवारांमध्ये वाद झाला. दोन्ही गटांत तुफान राडा झाला. कालांतराने घटनास्थळी पोलीस पोहोचले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. त्यानंतर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, दिवसभर चाललेल्या या धुमश्चक्रीनंतरही शिवपरिवाराने ८६.८० टक्के मतदान केले.
येथील शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पाच केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष, एक कोषाध्यक्ष, तर चार सभासद अशा नऊ कार्यकारी पदाच्या निवडीसाठी २१ उमेदवार रिंगणात होते. ७७४ पैकी ६७२ मतदारांनी मतदानात सहभाग नोंदविला. मात्र, मतदान केंद्र क्रमांक पाच येथे दुपारी १२ वाजताच्या दरम्यान मतदारांना प्रलोभन आणि उमेदवारांना मतदान करण्याविषयी केंद्रात प्रचार सुरू असल्यावरून दोन गटांत वाद झाला.
त्यानंतर विकास आणि प्रगती पॅनल समर्थक, उमेदवार आमने-सामने आलेत. तू-तू, मै-मै झाली. एकमेकांना धुक्काबुक्की देण्यापर्यंत हा वाद विकोपाला पोहोचला. पाऊण तासभर तुफान राडा चालला. त्यानंतर मतदान केंद्रावर पोलीस दाखल झालेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
दरम्यान, मतदान केंद्रावरून सहा जणांना ताब्यात घेतले आणि निवडणूक आटोपताच त्यांना सोडण्यात आले. मात्र, शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच गालबोट लागल्याची ही दुर्दैवी घटना घडली, अशी भावना आजीवन सभासदांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.