अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात 'छत्रपती शिवाजी महाराज विचारधारा आणि व्यवस्थापन' विषयाचा दोन वर्षांचा स्नातकोत्तर अभ्यासक्रम (पी.जी. कोर्स) सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता दिली आहे. मात्र, हा अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. विद्यापीठात फेब्रवारीत व्यवस्थापन परिषदेची सभा घेण्यात आली. अर्थसंकल्पाविषयी पार पडलेल्या या सभेत महत्त्वाचे प्रश्न, प्रस्तावावरही लक्ष वेधण्यात आले. यावेळी राज्यपाल नामनिर्देशित व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिनेश सूर्यवंशी यांनी प्रस्ताव क्रमांक १५९ अन्वये शिवाजी महाराज ‘मॅनेजमेंट’ हा अभ्यासक्रम सुरू करण्याची मागणी सामाजिक संघटनांची आहे. मात्र, उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नवीन खर्चाविषयीचे कोणतेही प्रस्ताव किंवा मागणी करू नये, असे विद्यापीठाला कळविले आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, पराक्रम हे नव्या पिढीला कळावेत. किल्ल्यांचे महत्व, त्यांचे शूरकार्य अभ्यासक्रमात शिकविणे ही काळाची गरज असल्याचे दिनेश सूर्यवंशी म्हणाले. निधी नाही म्हणून अभ्यासक्रम सुरू न होणे हे संयुक्तीक नाही. शिवाजी महाराज ‘मॅनेजमेंट’ अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी विद्यापीठाने सामाजिक संघटना, दानशूर व्यक्तींना आवाहन करून निधी उभारावा, असे सूर्यवंशी म्हणाले. त्यामुळे शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांच्या मागणीनुसार शिवाजी महाराज यांची विचारधारा व व्यवस्थापन या विषयाच्या दोन वर्षांच्या स्नातकोत्तर अभ्यासक्रम किंवा अल्पकालीन अभ्यासक्रम, ऐच्छिक अथवा पदव्युत्तर स्तरावर सुरू करण्यास व्यवस्थापन परिषदेने तत्वत: मान्यता प्रदान केली आहे. तथापि, यासंदर्भात समग्र विचारविनिमय करून शिफारस करण्याच्या दृष्टीने सदर बाब अधिष्ठाता मंडळाकडे पाठविण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
‘‘ शिवाजी महाराज मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी व्यवस्थापन परिषदेने मान्यता प्रदान केली आहे. मात्र, निधीबाबत तरतूद नाही. यासंदर्भात येत्या सिनेटमध्ये याविषयी चर्चा होऊन काहीतरी निर्णय लागण्याची शक्यता आहे. - हेमंत देशमुख संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ