अमरावती - एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे देखील दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. राज्यातील विविध नेते यावरुन टीका करत आहे. महाराष्ट्रातील अमरावतीचेआमदाररवी राणा यांनी देखील ओवेसी यांच्यासह महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. तसेच, शिवसेना ही सुलतान सेना झाल्याचंही आमदार राणा यांनी म्हटलं होतं. त्यावरुन, आता छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे मारुन निषेध नोंदविण्यात आला.
अमरावती मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी नुकताच शिवसेना ही सुलतान सेना झाली असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपुरी गेट परिसरात छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्यावतीने आमदार रवी राणा यांच्या पोस्टरला जोडे मारत, पोस्टर जाळून निषेध नोंदविण्यात आला. नागपुरी गेट परिसरात मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. नुकत्याच झालेल्या 2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अल्पसंख्याक समाजाने राणा दाम्पत्यांना मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला होता. मात्र, आता हनुमान चालीसा मुद्द्यावरून राणा दांपत्य कट्टर हिंदुत्वाकडे वळल्याने अल्पसंख्याक समाजाकडून त्यांचा निषेध करण्यात आला आहे.
काय म्हणाले रवी राणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसेने करणार आहेत की औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहायला जाणार आहेत, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे. ओवेसी इथे आले आणि औरंगजेबच्या कबरीवर फुले वाहून गेले. माझ्या राजकीय जीवनात त्या कबरीवर कोणी गेल्याचं ऐकलं नव्हतं. मात्र, ठाकरे सरकार आल्यावर हे पहिल्यांदाच घडलं, अशी टीका रवी राणा यांनी केली. तसेच तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग तुमच्या राज्यात असं कसं काय घडू शकतं, असा सवालही रवी राणांनी उपस्थित केला आहे.