कॅप्शन - परतवाडा आगारात अडकलेले चालक-वाहक व मालवाहतुकीसाठी आणलेले वाहन
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
धुळ्याचे चालक परतवाड्यात अडकले
अनिल कडू - परतवाडा (अमरावती) : मालवाहतुकीच्या अनुषंगाने धुळ्यावरून निघालेल्या एसटी चालकांना परतवाड्यात शिवभोजन थाळीचा आधार घ्यावा लागला. परतीच्या भाड्याअभावी ते परतावाड्यातच अडकले आहेत. त्यांना परतीच्या भाड्याची प्रतीक्षा आहे.
धुळे विभागातील चालक सचिन सूर्यवंशी आणि उदय नेरकर हे मालवाहक एसटी (एमएच २० डी ८५२६) घेऊन १७ मे रोजी धुळ्यावरून निघाले. १८ मे रोजी सायंकाळी ते परतवाडा येथे पोहोचले. गाडीतील माल एका एजन्सीकडे पोहोचता केला आणि ती बस परतवाडा आगारात उभी केली. कोरोना, लॉक डाऊन, कडक निर्बंध, पाऊस आणि खंडित विद्युत पुरवठा त्यांच्याकरिता अडचणीचा ठरला.
दरम्यान स्थानिक कर्मचाऱ्याला याची माहिती मिळाली त्याने त्यांच्याकरिता जेवणाचा डबा पोहोचता केला. रात्र काढल्यानंतर सकाळी जेवणाकरिता ते शिवभोजन थाळी केंद्रावर पोहोचले. तेथे शिवभोजन थाळीचा त्यांनी आस्वाद घेतला. पण, त्यांना आपल्या गावी जाता आले नाही.
एसटी महामंडळाच्या निर्देशानुसार, मालवाहक गाडीला जोपर्यंत परतीचे भाडे मिळत नाही, तोपर्यंत ती गाडी चालकासह आपल्या विभागात पोहचू शकत नाही. त्यामुळे या चालकांना जेव्हा परतीचे भाडे मिळेल तेव्हाच त्यांना गावाकडे पोहोचता येईल. तोपर्यंत यांना परतवाड्यातच थांबावे लागणार आहे. तोपर्यंत शिवभोजन थाळी त्यांचे भोजन, तर मालवाहू गाडी त्यांचे घर झाले आहे. या गाडीतच ते आपला मुक्काम ठोकून आहेत.
कोरोनाकाळात आपल्या आई-वडिलांसह कुटुंबीयांपासून, मुलाबाळांपासून दूर होत मालवाहतूक करणाऱ्या या एसटी चालकांना महामंडळाकडून कुठलाही भत्ता दिला जात नाही. त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था केली जात नाही. निदान महामंडळाने अशा चालकांना भत्ता द्यावा. ज्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होतो, त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाची सोय लावावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात आहे. लॉकडाऊनमुळे या कर्मचाऱ्यांना, चालकांना परिस्थितीनुरूप उपाशी वा अर्धपोटी झोपावे लागत आहे.