धारणी : गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली. त्याआधी डीएफओ विनोद शिवकुमार हा हरिसाल परिसरात होता. सायंकाळच्या सुमारास तो चिखलदऱ्याला स्वत:च्या शासकीय निवासस्थानी गेला. फ्रेश झाला. मात्र, मोबाईलला रेंज नसल्याने सोशल मीडियावर काय व्हायरल होत आहे, यासोबत दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली, यापासून तो अनभिज्ञ होता. मात्र, रात्री १० च्या सुमारास त्याला चव्हाण यांच्या आत्महत्येची बातमी कुणी तरी मौखिक दिली.
पोलीस सूत्रांनुसार, मोबाईलला रेंज आल्यानंतर तो नखशिखांत हादरला. तोपर्यंत दीपाली चव्हाण यांनी रेड्डी यांच्या नावे सुसाईड नोट लिहिली. त्यात आपले नाव असल्याचेदेखील त्याला कळले. त्याने लगेचच एक बॅग घेऊन शासकीय वाहनाने परतवाडा येथील कार्यालय गाठले. तेथे शासकीय वाहन ठेवून तो खासगी वाहनाने नागपूरकडे रवाना झाला. त्याला बंगळुरु येथे जायचे होते. त्याने तेथे जाणाऱ्या रेल्वेची वेळदेखील शोधली. शुक्रवारी सकाळी ९ च्या सुमारास तो एका रेल्वेने बंगळुरुकडे पसार होणार होता. त्यासाठी शुक्रवारी सकाळी त्याने नागपूर रेल्वे स्टेशन गाठले व तो अलगद अमरावती ग्रामीण पोलिसांच्या तावडीत सापडला.
------------