परतवाडा (अमरावती) : अमरावतीहून परतवाड्याकडे येणाºया शिवशाही बसने भूगावनजीक पेट घेतला. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शिवशाहीमधील अग्निशमनचे सिलिंडर निरुपयोगी ठरल्याने प्रवासी व चालकाने माती टाकून आग विझविली. या घटनेत ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.परतवाडा आगाराची एमएच ०९ ईएम १६३३ क्रमांकाची शिवशाही बस दुपारी ३़.३० सुमारास ३५ प्रवासी घेऊन अमरावतीहून परतवाड्यासाठी निघाली. भूगावनजीक ती ४ च्या सुमारास अचानक बंद पडली आणि स्टेअरिंग जवळून धूर व आगीच्या ज्वाळा निघायला सुरुवात झाली. हा प्रकार पाहून चालक एम.बी. तायडे यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि शिवशाहीतील अग्निशमनचे सिलिंडर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. प्रवासी व चालकाने गांभीर्याचा परिचय देत रस्त्याच्या कडेवर असलेली माती टाकून पेटती गाडी विझवण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला.
तिसऱ्या एसटी बसमध्ये सापडले सिलिंडरपरतवाडा-अमरावती मार्गावर परिवहन महामंडळाच्या बस दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने धावतात. पेट घेतलेल्या शिवशाही बसपुढून दहा मिनिटांच्या अंतरात तीन बस गेल्या. त्यातील दोन बसमध्ये अग्निशमन सिलिंंडर नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिसऱ्या बसमध्ये सिलिंडर होते. मात्र, तोपर्यंत शिवशाही बसला लागलेली आग आटोक्यात आली होती. अचलपूर तालुक्यातील देवगावचे सरपंच गजानन येवले, उपसरपंच सोनूजी खडके हे या बसमधून प्रवास करीत होते. त्यांनीही आग विझवण्यास मदत केली.