अमरावती : गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेच्या वाट्याला परिवाहन खाते आले होते. यामुळे राज्यभरात शिवशाही बस सुरु करण्यात आल्या होत्या. यामध्ये खासगी कंत्राटदारांच्या बसेसही आहेत. या शिवशाही बसेसच्या सेवेबद्दल अनेकदा तक्रारी येत होत्या. आज एक धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पुण्यातून अमरावतीला निघालेल्या प्रवाशांना रस्त्यातच उतरावे लागले आहे.
पुण्याहून अमरावतीकडे २२ प्रवासी घेऊन निघालेली शिवशाही बस एका फायनान्स कंपनीने हप्ते थकविल्याने बोरगाव मंजुजवळ जप्त केली. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरच उतरावे लागले. फायनान्स कंपनीने एका चारचाकी वाहनाची सोय करून प्रवाशांना अमरावतीपर्यंत सोडून दिल्याने त्यांना दिलासा मिळाला.
पुण्याहून एमएच २९ बी १०१९ या क्रमांकाची शिवशाही बस सायंकाळी ७ वाजता २२ प्रवासी घेऊन अमरावतीकरिता निघाली होती. शिवशाही बसेस या महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या अधिकार क्षेत्रात जरी चालत असल्या तरी, त्या खासगी आहेत. खासगी कंपनींकडून या बसेस चालविल्या जातात. संबंधित कंपनीने शिवशाही बस ही फायनान्सवर खरेदी केली होती. तिचे हप्ते थकीत असल्यामुळे कंपनीने जप्तीची कारवाई केली. बोरगाव मंजू बस स्थानकावर सकाळी ७ वाजता फायनान्स कंपनीचे कर्मचारी शिवशाही बसच्या आडवे होऊन चालक पोहोकारकडून बसची चावी घेतली. बसमधून प्रवाशांसह चालक व वाहकाला उतरून घातले. बस बोरगाव मंजू बस स्थानकावर जप्त करून उभी केली आहे.
सदर शिवशाही बस पांढरकवडा येथील कंपनीची असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आगारप्रमुख जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता, शिवशाही बस जप्त केल्याची माहिती मिळाली. मात्र, त्यासंबंधित कंपनीकडून कुठल्याही प्रकारचे कागदपत्र अद्याप प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात आले.