काँग्रेसला धक्का; सुलभा खोडके बांधणार 'घड्याळ'!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:08 PM2024-10-08T13:08:48+5:302024-10-08T13:10:31+5:30

Amaravati : रविवारी अजित पवारांचा सत्कार; आमदारांकडून शक्तिप्रदर्शनाची तयारी

Shock to Congress; Sulabha Khodke will be in Rashtrawadi | काँग्रेसला धक्का; सुलभा खोडके बांधणार 'घड्याळ'!

Shock to Congress; Sulabha Khodke will be in Rashtrawadi

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस की राष्ट्रवादी? कोणत्या पक्षाचा एबी फॉर्म लावून उमेदवारी अर्ज भरायचा, या द्विधा मनस्थितीत असलेल्या सुलभा खोडके यांनी अमरावती मतदारसंघातून काँग्रेसच्या 'पंजा'वर निवडणूक लढवली अन् विजयी झाल्या. त्यावेळी भाजपचे डॉ. सुनील देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. तथापि आमदार काँग्रेसच्या असताना सुलभाताई? या पाच वर्षे कायम राष्ट्रवादीतच रमल्या, हे विशेष. यंदा मात्र त्या पुन्हा हातात घड्याळ बांधणार, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.


अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार गेले, तर काही दिवसांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली नि महायुतीत सामील झाले. तसेही सत्ता अन् राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण फार जुने आहे. महायुतीत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले.


तेव्हापासून काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटासोबत अधिक सलगी वाढली. अमरावती मतदारसंघाच्या विविध विकासकामांसाठी निधी असो वा शासन स्तरावर प्रलंबित समस्या असो त्या प्राध्यान्याने सोडविण्यासाठी सुलभाताईंनी दादांचीच मदत घेतली. मध्यंतरी राज्यसभा, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांवर 'क्रॉस व्होटिंग' केल्याचा ठपका ठेवण्यात आला. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ज्या पाच आमदारांनी दगाफटका केला त्यांना विधानसभेची उमेदवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभाताईंचेही नाव होते.


त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारात त्या कुठेच दिसल्या नाही. एकंदरीत आमदार खोडके यांची वाटचाल अजित पवार गटाकडे आहे. महायुतीतून शिंदेसेनेनेही अमरावतीवर दावा केला आहे. किंबहुना अजित पवार पक्षाला अमरावतीची जागा सुटल्यास भाजप, शिंदेसेना कोणती भूमिका घेणार, याकडे अनेकांचा नजरा लागणार आहे. 


भाजप अमरावती सोडणार का? 
भाजप-सेना युतीपासून अमरावती मतदारसंघ हा भाजपच्या वाट्याला आहे. विधानसभा, विधान परिषद निवडणुकीत भाजपला यापूर्वी यश मिळाले आहे. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघ हा मित्र पक्षाच्या वाट्याला जाईल, असे संकेत आहेत. परंतु काहीही झाले तरी अमरावतीत 'कमळ' हवे, अशी भाजप पदाधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे मागणी आहे. बघू या वरिष्ठ अमरावतीबाबत काय निर्णय घेतात!

Web Title: Shock to Congress; Sulabha Khodke will be in Rashtrawadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.