प्रदीप भाकरे अमरावती: विधानसभा निवडणुकीची घोषणा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्या अनुषंगाने महायुतीतील भाजप, शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गट या तीन पक्षांचे विधानसभानिहाय समन्वयक जाहिर करण्यात आल्याची एक पोस्ट बुधवारी सोशल व्हायरल झाली आहे. त्यात बडनेरा मतदारसंघासाठी भाजपतर्फे आमदार रवी राणा यांचे नाव समन्वयक म्हणून समोर आल्याने भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. बडनेरा मतदारसंघातील भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेले स्थानिक नेते व आ. रवि राणा यांच्यातील विळा भोपळ्याचे सख्य सर्वश्रूत आहे. त्यामुळे राणा यांच्या समन्वयकपदानंतर येथील भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले आहे. त्या यादीची अधिकृतता समोर आलेली नाही.
दुसरीकडे, अमरावती मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक म्हणून भाजपचे नेते व माजी राज्यमंत्री जगदीश गुप्ता यांचे नाव प्रसिद्ध झाल्यानेही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. गुप्ता हे अमरावती विधानसभा लढण्यास इच्छूक आहेत. ते भाजपचे नेते देखील आहेत. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे समन्वयक म्हणून त्यांचे आलेले नाव अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे. आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी लोकसभा निवडणुकीपुर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. पण, त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आमदार रवी राणा यांनी सावधपणे पावले टाकण्यास सुरूवात केली आहे.
गेल्या महिन्यात रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षातर्फे आयोजित दहींहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, तेव्हा राणा यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र दुसरीकडे राणा यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी असलेले सख्यही जगजाहिर आहे. लोकसभेवेळी देखील स्थानिक भाजपाईंचा विरोध पत्करून, डावलून नवनीत राणा यांना अमरावतीची उमेदवारी मिळाली होती. आता देखील भाजपचे तुषार भारतीय यांनी बडनेरा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची जोरदार तयारी चालविली आहे. भारतिय आणि राणा यांच्यात छत्तीसचा आकडा आहे. त्यामुळे बुधवारी व्हायरल झालेल्या यादीत भाजपचे बडनेरा विधानसभा समन्वयक म्हणून आ. रवि राणा यांचे नाव असल्याने ओरिजनल भाजपाईंमध्ये चिंतेची लकेर उमटल्याचे दिसले. व्हायरल यादी खरी की कसे, त्यावर कुणीही भाष्य केले नाही.