अमरावती: युनियन बँकेतील ३७ लाॅकर्समध्ये तब्बल २७०० ग्रॅम खऱ्या सोन्याऐवजी बनावट सोने ठेवल्याची धक्कादायक बाब तपासादरम्यान उघड झाली आहे. २७०० ग्रॅम खरे सोने तारण ठेवून ज्या ३७ ग्राहकांनी गोल्ड लोन घेतले, त्यांच्या लॉकर्समधील खरे सोने काढून तेथे बनावट सोने आढळल्याने स्थानिक यूबीआय आरोपीच्या पिंजऱ्यात आली आहे. बँकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संगनमताशिवाय हा कोट्यवधीचा फ्रॉड शक्यच नाही. त्यांचा रोल ‘क्रिस्टल क्लिअर’ असल्याचे तपास यंत्रणेचे निरीक्षण आहे. त्यामुळे यूबीआयच्या स्थानिक अधिकारी कर्मचाऱ्यांवर अटकेची टांगती तलवार आहे.
उज्ज्वल मळसने (४१, रा. आचल विहार कॉलनी) यांनी ३१ डिसेंबर २०२० रोजी राजापेठस्थित युनियन बँकेतून १०० ग्रॅम सोन्याचे दागिने तारण ठेवून त्यावर ३.३० लाख रुपये कर्ज घेतले होते. ६ ऑगस्ट रोजी तारण असलेले सोन्याचे दागिने पाहिले असता, ते बनावट असल्याचे दिसले. त्यावरून बँक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपल्या ५.५० लाख रुपयांच्या दागिन्यांचा अपहार केल्याची तक्रार मळसने यांनी केली. त्यावरून राजापेठ पोलिसांनी १२ ऑगस्ट रोजी रात्री यूबीआयच्या स्थानिक अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. तो गुन्हा अधिक तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर बँकेकडून गोल्ड लोनबाबतचा ऑडिट रिपोर्ट मागविण्यात आला. त्यात ज्या ३७ ग्राहकांनी तारण म्हणून २७०० ग्रॅम सोने यूबीआयमध्ये ठेवले, ते आतल्या आत बनावट झाले आहे. पाहणी केली असता, ते बनावट आढळून आले. बँकेने तशी कबुली देखील दिली आहे. त्यामुळे ते खातेधारक देखील आर्थिक गुन्हे शाखेची पायरी चढू लागले आहेत.
२२ खातेधारक म्हणतात, आम्ही गोल्ड लोन घेतलेच नाही
राजापेठ स्थित युनियन बँक ऑफ इंडियात एकूण ५९ लाॅकर्स मधील ५४०० ग्रॅम सोने बनावट आढळले. पैकी ३७ ग्राहकांनी ते २७०० ग्रॅम सोने खरे ठेवले होते. मात्र, उर्वरित २२ लॉकरमध्ये जे २७०० ग्रॅम सोने बनावट आढळून आले आहे, ते संपूर्णत: संशयास्पद आहे. ते २२ लॉकर व ज्यांच्या नावावर गोल्ड लोन दाखविण्यात आले, त्यांनी गोल्ड लोन घेतलेेच नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे २२ बनावट खातेधारकांच्या नावावर बनावट सोने ठेवून गोल्ड लोन उकळले तरी कुणी, या दिशेने पोलिसांनी तपास चालविला आहे. हा गैरव्यवहार सुमारे २.५ कोटींच्या घरात पोहोचला आहे.गोल्ड लोन या घटकात फ्रॉड आढळून आला आहे. सबब, आठ दिवसांमध्ये यूबीआयला लेखापरीक्षण अहवाल मागितला आहे. तो आल्यानंतर आरोपींचे चेहरे उघड होतील.
- शिवाजी बचाटे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा