प्रदीप भाकरेअमरावती : शाळेतून परतताच एका १३ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक व समाजमन सुन्न करणारी घटना सोमवारी सायंकाळी चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव बंड येथे घडली. आठवीत शिकणाऱ्या त्या विद्यार्थ्याच्या अकाली मृत्यूने समाजमन हादरले असून, त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. कार्तिक प्रवीण मनोहरे (१३, शिरजगाव बंड) असे मृत मुलाचे नाव आहे.
शिरजगाव बंड येथील कार्तिक चांदूरबाजार येथील नगरपरिषद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होता. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास तो चांदूरबाजारहून गावी परतला. शाळेचा गणवेश न काढता त्याने घरातील एका खोलीत गळफास घेतला. त्यावेळी त्याचे आईवडिल मजुरीला गेले होते. तर आजी घराबाहेर होती. बराचवेळ होऊनही कार्तिक खोलीबाहेर आला नसल्याने आजीने आत जाऊन पाहिले असता, कार्तिक साडीने साहाय्याने पंख्याला गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. त्यामुळे त्याच्या आजीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली. आईवडिलही घरी परतले. तातडीने चांदूरबाजार ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. दरम्यान मंगळवारी शवविच्छेदन होऊन त्याचे पार्थिव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. चिमुरड्या कार्तिकचा मृतदेह पाहताच त्याचे वडील शून्यात हरविले. तर आईचा टाहो काळीज पिळून टाकणारा होता.खाकीही झाली सुन्नघटनेची माहिती मिळताच चांदूरबाजारचे ठाणेदार अशोक जाधव, अंमलदार अजय पाथरे व दिलिप इंगळे यांनी शिरजगाव बंड गाव गाठले. तेथे घटनास्थळाचा पंचनामा करताना ग्रामस्थांसह खाकी देखील सुन्न झाली. कार्तिकच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने पोलीसही अधिक माहिती घेऊ शकले नाही. कुणाचीही मानसिकता नसल्याने खाकीला देखील मर्यादा आल्या. परिस्थिती निवळल्यावर शॉकमध्ये असलेल्या मनोहरे कुटुंबियातील सदस्यांचे बयाण नोंदविले जाणार आहे. सोबतच, त्याच्या शाळेतील वर्गशिक्षकासह मुख्याध्यापक, त्याच्या वर्गमित्रांना देखील विचारणा केली जाणार आहे.विविध बाजू तपासणारइतक्या कमी वयात एखादा मुलगा थेट गळफास लावून घेण्याच्या टोकाच्या भूमिकेपर्यंत कसा पोहोचू शकतो, असा प्रश्न तपास यंत्रणेला पडला आहे. त्यामुळे ऑनलाईन गेम, विद्याथ्यांमधील वाद, अभ्यासाचे टेंशन या बाजु देखील तपासल्या जाणार आहेत. लोकचर्चेनुसार, शिरजगावमधील त्याच्याच एका शेजारी राहणाऱ्या मुलाने काही दिवसांपुर्वी आत्महत्या केली होती, त्या घटनेचा कार्तिकच्या आत्मघाताशी संबंध आहे की कसे, हे तपासले जाणार असल्याची माहिती तपास अधिकारी अजय पाथरे यांनी ‘लोकमत’ला दिली.