अमरावती : सुपर स्पेशालिटीत कोविड-१९ च्या उपचारार्थ दाखल असलेल्या एका ७२ वर्षीय इसमाचा गाडगेनगर हद्दीतील भीमनगरात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. रुग्ण हा सुपर स्पेशालिटी प्रशासनाच्या देखरेखीत असताना, बाहेर पडला कसा, प्रशासनाच्या अफलातून कारभारामुळेच रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यासंदर्भात नातेवाईक गाडगेनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचले होते.
किसन श्रावण झुरे (७२, रा. आजणगाव, ता. धामणगाव रेल्वे) असे बेवारस आढळलेल्या कोरोना रुग्णाचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, २२ एप्रिल रोजी मृत किसन यांची कोविड चाचणी केली असता, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला. त्याआधारे सुपर स्पेशालिटीच्या कोविड कक्षात याच दिवशी भरती करण्यात आले. त्यानंतर २३ एप्रिल रोजी नातेवाईकांनी मृत किसन यांच्या आजाराबाबत चौकशी केली असता, त्यांना प्राणवायू लावण्यात आला असून, ते ठीक आहेत, असे सुपर रुग्णालयाच्या प्रशासनाने सांगितले. २४ एप्रिल रोजी नातेवाईंकांनी जेवणाचा डबादेखील पोहोचविला. तेव्हाही तुमचा रुग्ण बरा असून, प्राणवायू काढण्यात आल्याची माहिती नातेवाईकांना देण्यात आली. मात्र, २४ एप्रिल रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भीमनगरात एक अनोळखी मृतदेह आढळून आला. त्यानंतर या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी इर्विन रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले. रविवारी, २५ एप्रिल रोजी मृत किसन यांचे नातेवाईक सुपर स्पेशालिटीत दुपारी ३ वाजता पोहाेचलेे असता तुमचा रुग्ण ठणठणीत असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितल्याची माहिती मृत किसन यांचा मुलगा मारोती झुरे यांनी दिली. परंतु, मृत किसन यांच्या जावयांना तुमचे सासरे मृतावस्थेत आढळल्याची माहिती मोबाईलवरून देण्यात आली. त्यानंतर नातेवाईकांनी पुन्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात धाव घेतली. आम्हाला रुग्णांची भेट घ्यायची आहे, अशी विनवणी केली. मात्र, कोविड कक्षात जाता येणार नाही, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले. नातेवाईकांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाऊन शनिवारी आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाबाबतची ओळख पटविण्याचे सांगितले. तेव्हा इर्विन रुग्णालयाच्या शवागारात नातेवाईकांनी मृतदेह बघताच ते किसन झुरे असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. यावरून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचा कारभार कसा सुरू आहे, हे स्पष्ट होते.
-------------------
शनिवारी मृत्यू, रविवारी पटली ओळख
शनिवारी दुपारच्या सुमारास भीमनगरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचमामा करून नागरिकांच्या मदतीने तो मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात ठेवला. मृताची ओळख पटविण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले होते. दरम्यान रविवारी दुपारच्या सुमारास नातेवाईकांनी पोलिसांसोबत इर्विनमधील मृतदेह पाहिला असता, त्याची ओळख पटली.
-----------------
बॉक्स
रुग्णालयाच्या भोंगळ कारभारावर ताशेरे
कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून बाहेर निघाला आणि त्याचा मृतदेह आढळून आल्याचे नातेवाईकांना समजताच त्यांचे रोष उफाळून आला. नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त करून डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे. यासंदर्भातील तक्रार देण्यासाठी नातेवाईक गाडगेनगर ठाण्यात पोहोचले होते. उशिरा सायंकाळपर्यंत पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू होती.
--------------------
शनिवारी दुपारच्या सुमारास भीमनगरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह उचलून इर्विनच्या शवविच्छेदनगृहात ठेवला. मृतक व्यक्ती हा कोरोनाबाधित असल्यामुळे त्यांना सुपर स्पेशालिटीत दाखल केले होते, असे नातेवाईक सांगतात. रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांविरुद्ध नातेवाईक तक्रार देण्यासाठी आले आहे.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक गाडगेनगर.
---------
२२ एप्रिल रोजी वडील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच दिवशी सुपर स्पेशालिटीत दाखल केले. मात्र, २३ ते २५ एप्रिल दरम्यान मृत किसन झुरे यांच्याबाबत रुग्णालयाने दिशाभूल करणारी माहिती दिली. रुग्णालयाच्या बाहेर कोरोना रूग्ण बाहेर पडतात आणि त्यांचा मृतदेह बेवारस आढळतो, हे सर्व धक्कादायक आहे. पोलिसांत तक्रार देणार आहे.
- मारोती झुरे, आजगणाव, (मृताचा मुलगा)