उज्वल भालेकर / अमरावती : शहरातील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये कार्यरत कामगारांनी पाणी पिल्याने त्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कामगारांना अचानक संडास, उलट्या सुरु झाल्याने हा प्रकार उघड झाला. शंभरच्या जवळपास कामगारांना विषबाधा झाल्याचे कामगारांचे म्हणणे असून यातील ४१ रुग्ण हे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तर काही खासगी रुग्णालयात गेल्याचे सांगण्यात आले. यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने रुग्णालय गाठून संबधित प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
शहरातील नांदगाव पेठ एमआयडीसी परिसरात गोल्डन फायबर नावाची कंपनी असून येथे १८० च्या जवळपास कामगार कार्यरत आहे. या कंपनीमध्ये धागा तयार केला जातो. सकाळच्या ८ वाजताच्या शिफ्टमध्ये येथे कामगार कामावर आले. यावेळी त्यांनी येथील पाणी पिल्यानंतर काही वेळाने त्यांना उलटी, संडास सुरु झाली. हा प्रकार लक्षात येताच सुरुवातीला कंपनीने खासगी डॉक्टरांना बोलवून उपचार सुरु केले होते. परंतु याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष मंगेश पाटील यांना मिळताच त्यांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने कंपनी गाठली.
यानंतर विषबाधा झालेल्या कामगारांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली. जवळपास ४१ कामगार हे इर्विन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. यामध्ये ३६ महिला तर ५ पुरुष कामागरांचा समावेश आहे. यावेळी खासदार बळवंत वानखडे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून विषबाधा झालेल्या महिलांकडून संबधित प्रकार जाणून घेतला. यावेळी पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कंपनीच्या एचआर प्रमुखाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.