चिखलदरा (अमरावती) : चिखलदरा तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या पाचडोंगरी व कोयलारी येथे दूषित पाणी पिल्याने दोघांचा मृत्यू झाला, तर शंभरपेक्षा अधिक आदिवासींना लागण झाल्याची धक्कादायक घटना निदर्शनास आली आहे.
रुग्णांवर काटकुंभ आरोग्य केंद्र, चुरणी ग्रामीण रुग्णालय व गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत आरोग्य विभागाच्या वतीने उपचार केले जात आहेत. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेचा कारभार उघड झाला आहे.
गंगाराम नंदराम धिकार (२५), सविता सहदेव अखंडे (३०), अशी मृतांची नावे आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजेदरम्यान चुरणी ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉ. साहेबराव धुर्वे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. अतिसाराची लागण झालेल्या रुग्णांवर जिल्हा आरोग्य यंत्रणेची ३० जणांची चमू उपचार करीत आहे.
चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित
मागील चार दिवसांपासून परिसराचा विद्युत पुरवठा खंडित असल्याने नागरिकांना नदी, नाल्याचे पाणी आणावे लागत आहे. पाचडोंगरी येथील नागरिकांनी एका शेतकऱ्याच्या शेतातील खासगी विहिरीतून पाणी भरले. ब्लिचिंग पावडर व पाणी शुद्धिकरण न करता वापरले. त्यामुळे संपूर्ण गावात अतिसाराची लागण झाली. सायंकाळपासूनच गावात उलटी, हगवणची साथ सुरू झाली.
म्हणे यंत्रणा सज्ज, ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते!
पावसाळ्यात संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश न्यायालयाचे आहेत. दूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात आजाराने आदिवासी नागरिकांसह कुपोषित बालकांचा जीव धोक्यात येतो. गत महिन्यात खंडित विद्युत पुरवठा व त्याचे दुष्परिणाम यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये प्रकाशित केले होते. मध्य प्रदेशच्या भैसदेही येथून जारिदा सब स्टेशनला पुरवठा केला जातो.
दूषित पाण्यामुळे लागण झाल्याचे प्राथमिक पुढे आले आहे. गावातच कॅम्प उघडला असून, काटकोन चुरणी येथील दवाखान्यात उपचार सुरू आहे. चार दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याचे नागरिकांनी सांगितले. दोघांचा मृत्यू झाला आहे
सतीश प्रधान, तालुका वैद्यकीय अधिकारी चिखलदरा
चार दिवसांपूर्वी आपली पाचडोंगरी ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती झाली. विद्युत पुरवठा खंडित आहे. ब्लिचिंग पावडरसुद्धा आणले आहे. खासगी विहिरीतून पाणी वरून वाहत जात असल्याने हा प्रकार घडला असावा.
व्ही. व्ही. सोळंके, ग्रामसेवक, पाचडोंगरी ग्रामपंचायत
ग्रामपंचायत, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग तसेच आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा आहे. आदिवासींच्या जिवाशी खेळ करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा.
पीयूष मालवीय, सदस्य रुग्ण कल्याण समिती, मेळघाट
पावसाळ्यात आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश असताना दूषित पाणीपुरवठा आदिवासींच्या जिवावर उठला आहे. दोघांच्या मृत्यूला कारणीभूत संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे
सहदेव बेलकर, अध्यक्ष काँग्रेस मेळघाट